महा आवाज News

सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन निवडणूक यशस्वीपणे पार पाडावी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कामे करुन निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वय अधिकारी यांच्या कामकाजाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिचंवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पिंपरी चिंचवड पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेची सर्व प्रशासकीय यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. मतदान केंद्रावर आवश्यक शौचालय, पाणी, व्हीलचेअर, रॅम्प, पाळणाघर, औषधोपचार, बसण्याकरीता बाकडे, आदी सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्राला भेटी देऊन उपलब्ध असलेल्या सोई-सुविधांची पडताळणी करावी. शहर हद्दीत महानगर पालिकांनी तर ग्रामीण हद्दीत जिल्हा परिषदेने या व्यवस्था कराव्यात असे आयोगाने निर्देश दिले आहेत.

मतदानाचा टक्का वाढविण्याकरीता मतदार नोंदणी, मतदार जनजागृतीविषयक शिबीरे आयोजित करावीत. बदलेल्या मतदान केंद्राविषयी मतदारांनी माहिती देण्यात यावी. एफएसटी पथके कार्यान्वित करण्यात यावीत. मतदान केंद्रात मोबाईल वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला असून याबाबत याबाबत यंत्रणेसह मतदारामध्ये जनजागृती करावी. आवश्यकतेप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावेत. जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पारदर्शक, निर्भय वातावरणात आणि सुलभ, सहजतेने पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे. निवडणूक प्रक्रियेत आपल्या दिलेल्या जबाबदारीप्रमाणे चोखपणे कर्तव्य पार पाडावे, असे डॉ. दिवसे म्हणाले.

ग्रामीण भागात अनधिकृत होर्डिंग्जवर निवडणूक प्रचाराबाबत होत असल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात यावी. आवश्यक तेथे गुन्हे दाखल करण्यात यावेत, असेही डॉ. दिवसे म्हणाले.

डॉ. भोसले म्हणाले, मतदान केंद्रावर उभारण्यात येणाऱ्या शौचालयाची स्वच्छता करावी. रॅम्प सुस्थितीत असल्याची खात्री करुन घ्यावी. मतदारांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. महानगरपालिका क्षेत्रात मतदार जनजागृतीवर भर देण्यात यावे. याकरीता समाजमाध्यमे, वाणिज्यिक आस्थापना, पीएमपीएल बसेस, महानगरपालिकांचे इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले फलक, लघुसंदेश आदी सुविधांचा वापर करावा. तसेच बचतगट गणेश, नवरात्र आणि दहीहंडी मंडळासोबत बैठक त्यांचा सहभाग वाढवावा, शहरी भागातील मतदानाचा टक्का वाढविण्याकरीता महानगरपालिकेच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल.

शासकीय मालमत्तांचे विद्रुपीकरण कायद्याचे काटेकोर पालन व्हावे. शासकीय मालमत्तांवरील आचारसंहिता भंग होईल अशा राजकीय पक्षांच्या, राजकीय व्यक्तींच्या जाहिराती तत्काळ काढण्यात याव्यात. २४ तासाच्या आत जाहिराती, मजकूर काढण्यात यावा. खासगी इमारतीवरील, जागेतील मजकूर संबंधिताच्या परवानगीशिवाय लावलेला नसल्यास त्याबाबतही कठोर कारवाई करावी. विद्रुपीकरणबाबत केल्यास गुन्हे दाखल करावेत, असेही डॉ. भोसले म्हणाले.

पोलीस अधीक्षक श्री. देशमुख म्हणाले, संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे स्ट्राँगची पाहणी करुन आढावा घ्यावा. प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) नुसार हेलिपॅड व विमानाच्या धावपट्टीवरून उड्डाण परवानगीबाबत कार्यवाही व्हावी तसेच तेथील व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे, असेही श्री. देशमुख म्हणाले.

इतरांना शेअर करा