इंदापूर महाविद्यालयात प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संरचना आणि अंमलबजावणी या विषयावर परिषद संपन्न..
प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
शैक्षणिक व्यवस्थेत वेळोवेळी ज्या सुधारणा होत गेल्या त्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या धोरणाच्या संरचनात्मक मांडणीत आणि अंमलबजावणी मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अग्रगण्य भूमिका घेतली आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता आणि हमी कक्षाचे संचालक डॉ. संजय ढोले यांनी केले.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या दिशानिर्देशानुसार येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नियोजन आणि विकास विभाग यांच्या समन्वयातून प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी यांच्यासाठी एक दिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी डॉ. ढोले परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. प्रसंगी उद्घाटन, मार्गदर्शन, शंका – समाधान आणि समारोप अशा चार सत्रांमध्ये ही कार्यशाळा पार पडली.
यावेळी बोलताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ . प्रभाकर देसाई यांनी भूमिका मांडताना सांगितले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजावून घेणे अत्यावश्यक आहे.
शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचारी हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत धोरणात्मक बदल त्यांच्यापर्यंत पोहोचावे आणि अंमलबजावणी सुकर व्हावी यासाठी हे आयोजन केले जात आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी सांगितले की आमच्या संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी वेळोवेळी नवीन धोरणांना सकारात्मकता दर्शवत प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली होती त्यानुसार विद्यापीठाच्या सहकार्याने आम्ही परिषद घेत आहोत.
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अशोक काळंगे हे होते. प्रसंगी डॉ. काळंगे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी अनुषंगाने महाविद्यालयातील वस्तूस्थिती निदर्शक मांडणी केली.
यावेळी भिगवण येथील बी. एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या उज्वला लोणकर, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा चे प्राचार्य डॉ. लहू वावरे, प्राचार्य डॉ. घोडके, इंदापूर महाविद्यालयातील विविध शाखांचे प्रमुख डॉ. शिवाजी वीर, डॉ. भिमाजी भोर, डॉ. सदाशिव उंबरदंड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रास्ताविक डॉ. शिवाजी वीर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शाम सातर्ले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कार्यशाळेचे समन्वयक डॉ. संदीप शिंदे यांनी मानले.