ताकतोड्याच्या चिमुकल्याची गोरेगाव पोलिसांना पत्र..
प्रतिनिधी:गणेश सुतार ,सेनगाव प्रतिनिधी..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
पोलीस काका माझे मम्मी पप्पा मतदानाच्या दिवशी बाहेरगावी जाणार आहेत त्यांना मतदानाच्या दिवशी अटक करून मतदानाला न्या अन पुन्हा सोडून द्या अशी विनंती करणारे पत्र सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील चिमुकला साईराम सावके याने गोरेगाव पोलिसांना दि. 30 मार्च शनिवार रोजी दिले आहे.
हिंगोली लोकसभा मतदान संघात यावेळी 75% पेक्षा अधिक मतदान होण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे.त्यासाठी लोकसभा मतदार संघात प्रत्येक गावांमधून मतदार जनजागृती केली जात आहे. या शिवाय दिनांक 1 एप्रिल रोजी लोकसभा मतदार संघातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आई वडिलाकडून मतदानाचे संकल्प पत्र भरून घेतले जाणार आहे. सदर पत्र विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळेत जमा केले जाणार असून विद्यार्थीही मतदानास जाण्यासाठी आई वडीलाकडे हट्ट धरणार आहेत. सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील जिल्हा परिषद शाळेतील तिसरी वर्गातील विद्यार्थी साईराम कैलास सावके या चिमुकल्याने घरी आई-वडिलांमध्ये होणारा संवादच पत्राद्वारे मांडला असून मतदानाच्या दिवशी बाहेरगावी जाणाऱ्या आई-वडिलांना अटक करून मतदानाला नेण्याची विनंती केली आहे. घरी मतदानावरून आई-वडिलांचे भांडण झाले असून मतदानाच्या दिवशीच दोघेही बाहेरगावी जाणार आहेत. चांगल्या माणसांना मतदान केले तर चांगली माणसं सरकार मध्ये जातील व चांगले कामे करतील आमचे शिक्षक म्हणतात आपल्याकडे शंभर टक्के मतदान झाले पाहिजे. मात्र माझे मम्मी पप्पा बाहेरगावी जाणार असल्याने त्यांना मतदानाच्या दिवशी अटक करावी व मतदानानंतर त्यांना सोडून देण्याची विनंती साईराम सावके यांनी गोरेगाव पोलिसांना केली आहे. त्यांच्या या पत्राचे पोलीस विभागांनीही कौतुक करून त्यांचे पत्रही पोलीस दप्तरी नोंद करून घेतले आहे.