प्रतिनिधी:-सुधीर पाटील ..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
आटपाडी :…..
होय.. मृत्यू कोणाला चुकलाय?…जिथं जन्म तिथं मृत्यू अटळ. महाराष्ट्राचे प्रतिभावंत साहित्यिक वके (वसंत केशव) आज मनाला हुरहूर लावून अनंतात विलिन झाले.
सकाळी प्रणितदादाचा फोन आला तेव्हा ते गेले असे वाटलेच नाही.अजूनही “अरुण-अरुण” म्हणत अवतीभोवती आहेत असंच वाटलं.पण ते आता नसण्याचं वास्तव घेऊनच घरी गेलो.शांत चिरशांती घेत पहुडलेले वसंत केशव यांचे पार्थिव डोळ्यात साठवून घेतले.अगदी कोणताही क्लेश चेहऱ्यावर नाही.एकदम शांत झोप घेत असल्यासारखे वके अनंतात विलिन झालेत असे वाटलेही नाहीत.जणू काही मृत्यूनेच हार मानली होती आणि वके विजयी मुद्रेत आपल्याच गुंगीत पहुडल्याचा भास…
वके आणि माझा सहवास तसा थोडासाच.पण त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दोन वर्षात वसंत ऋतू पुन्हा बहरला आणि तो मी अनुभवला हीच काय ती माझी शिदोरी. रत्नपारख्यानं एखादं रत्न शोधावं तसं त्यांनी मला कसं काय शोधलं कोण जाणे.पण त्यांच्या माणसं ओळखण्याच्या आणि जपण्याच्या कलेला मी पुरेपूर अनुभवलं.ते आणखी काही वर्षे जगले असते तर मी आणखी समृद्ध झालो असतो.कारण ते मला वडिलांसारखे होते.
मी बनपुरीला निघालो की वसंत केशव सोबत असायचेच.मी त्यांना घेऊन जात असायचो.माणदेशातील मातीशी तिथल्या ओसाड माळरानाचा आणि तिथल्या माणसांचा त्यांना जिव्हाळा लागला होता. शुकाचारी, बानुरगड, भिवघाट, कवठेमहंकाळ,आटपाडी,माडगुळे,शे टफळे,खरसुंडी, लोटेवाडी, पंढरपूर अगदी मनसोक्त आम्ही फिरलो होतो.कधी फोर-व्हिलर तर कधी टू-व्हिलरवरचा प्रवास कधी सुखद तर कधी दुखद पण आनंददायी.
माझ्या बनपुरीच्या घरातला त्यांचा सहवास आणि प्रत्येकाशी आपुलकीचा स्नेह,अतूट नातं,अगदी घट्ट घट्ट बनत गेलेलं.माझ्या वडीलांचा त्यांचा विशेष स्नेह- ” काय विठ्ठलराव ” म्हणून त्यांच्याशी गप्पात दंग व्हायचे.आईच्या हातच्या जेवणाला चव आहे म्हणायचे.
गेल्यावर्षी पाडव्याला बनपुरीच्या यात्रेत माझ्या सोबत मनसोक्त फिरलेले वसंत केशव यावर्षी मात्र आजारपणामुळं न आल्याची पोकळी राहीली ती राहीलीच.
२० मे २०२३ .. माझ्या आई वडीलांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात वकेंचा सिहांचा वाटा. गदिमाचे नातू व नातसून दोन दिवस माझ्या बनपुरीच्या घरी वऱ्हाडी म्हणून आणण्याची जबाबदारी त्यांनीच पार पाडलेली. लग्नाच्या कार्यक्रमात उत्साही तरुण म्हणून वकेच शोभून दिसत होते.गदिमांचे नातू आणि वके अगदी मनसोक्त बेधुंद होऊन नाचण्याचे भाग्य माझ्या बनपुरीच्या अंगणाला लाभले हे केवढे मोठे अप्रूप होते माझ्यासाठी.याच कार्यक्रमात माझ्या काळजातल्या बापाला डबल डी.लिट चा दिलेला अनमोल आहेर मी कसा विसरू.तो क्षण काळजात कोरून ठेवलाय मी….!
त्यांना भेटायला कुणीही गेलं की आवर्जून ते बनपुरीचा विषय काढायचे.”अरुण माझा मुलगाच आहे” म्हणायचे.
अगदी त्यांच्या घरातही हेच नातं त्यांनी माझ्याबाबत जपलं होतं. आज खरंतर माझा एक बाप मला पोरका करून गेल्याची जाणीव आता होतेय.
दिनांक १७ व १८ डिसेंबर २०२३ चा आमचा बनपुरीचा शेवटचा दौरा ठरला.त्याही वेळी आम्ही कुटूंबासोबत बानुरगड,शुकाचारी सैर केलेली.भिवघाटातल्या माझ्या मित्राच्या केळीच्या बागेत रमलेलो.प्रत्येक वेळी जाता येता भिवघाटात थांबून आम्ही माझ्या मित्राकडे चहा घेऊन गप्पा मारून मगच पुढं जायचो.त्यांच्या कुमठे या गावी आणि अंकलखोप या सासुरवाडीला ते मला घेऊन गेलेले. त्यांच्या साहित्यातल्या आणि व्यक्तिगत जीवनातल्या प्रत्येक पाऊलखुणा त्यांनी मला दाखविलेल्या.आता त्या फक्त आठवणीच…
परवा सोमवारीच सरांना पाहून आलेलो.स्थितप्रज्ञ मुद्रा. तोंडातून श्वास सुरू होता.मी सरांना हाक मारली.हाताला स्पर्श करून पाहीलं.अगदी चिरनिद्रेत सर.शरिरात होणाऱ्या ज्ञात वेदनेचा जराही चेहऱ्यावर भाव नाही.नेहमी दिसतात तसेच अगदी चिरतरूण वाटले.तेव्हा मृत्यूशी शांतपणे झुंज देत लढणारे योद्धे असल्यागत वके वाटून गेले.खरंतर तेव्हाच मनात घालमेल झालेली….
…..आणि आज सकाळी २४ तासाच्या आत वकें मृत्यूवर विजय मिळवत अनंतात विलिन झाले…….
दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यावर थोडावेळ मागे त्यांच्या आठवणीत रेंगाळलो.”अरुण अरुण ” म्हणून साद घातल्याचा भास सतत जाणवत राहिला…..
खरंच वके म्हणजे माझा वडिलधारी माणूस म्हणून माझ्या प्रवासात सतत सोबत राहीले…आणि राहतीलही.
माझ्याच घरातल्या या वडीलधारी माणसाला श्रद्धांजली वाहताना डोळ्यांच्या कडा कधी ओलावल्या कळलंच नाही….!
दि. २४।०४।२०२४
……
प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर..
बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली .