महा आवाज News

शेषाप्पा तराळ – २ ”माणदेशातील एक सत्य घटना, त्याची कथा!

शेषाप्पा तराळ – २  ”
माणदेशातील एक सत्य घटना, त्याची कथा!
सुधीर पाटील 
आटपाडी                 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029                                
       आटपाडी :ब्रिटिश राजवटीमध्ये संस्थानच्या अखत्यारीतील आटगांव हे चंद्रकला नदीच्या काठावर वसलेले इतिहास कालीन महत्वाचे गांव होते. सदरचे गांव धन-धान्याने समृद्ध असलेमुळे पूर्वीच्या काळी परकीय आक्रमणे व चोराच्या धाडी हमेशा गावावर पडत असलेमुळे अनेकांच्या घरातील दाग- दागिने, अन्नधान्य व इतर वस्तूंची लयलूट होत होती. त्यामुळे गांवातील अनेकांनी आपल्या घराच्या खाली तळघरे, भुयारे, प्याव तयार करून घेऊन त्यामध्ये धन-धान्य सुरक्षितपणे संभाळून ठेवीत असत. परकीय आक्रमणाच्या संरक्षणसाठी गावच्या चहूबाजूंनी दगडी भिंतीची तटबंदी उभी करून टेहळणीसाठी चार दिशेला मोठे बुरुज बांधून घेतलेले होते. गावात प्रवेशासाठी मोठी वेस ठेवलेली होती, त्यास लोखंडी खिळ्याचा मोठा लाकडी दरवाजा बसविलेला होता, कालांतराने गांवावरची परकीय आक्रमणे व चोरीचे प्रमाण कमी झालेले होते, त्यामुळे गांवात शांतता असलेमुळे गाव- गाड्यातील कामे व्यवस्थित सुरू होती, परंतु गांवात काही दिवसांनी चोऱ्याचे प्रमाण वाढत चाललेले होते, त्यामुळे गावचे अमंलदार पाटील- कुलकर्णी यांनी संस्थानच्या आदेशानुसार गांवच्या संरक्षणासाठी “जागल्या” (पहारेकरी) म्हणून गावातील पूर्वश्रमीच्या महार समाजातील तरुण, धाडसी, बेडर असणारे शेषाप्पा, गेंदा, येताळा या तीन तराळांची नेमणूक गांवच्या स्वरक्षणासाठी करणेत आलेली होती.
      संस्थाने गाव- गाड्यांचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून, पूर्वपार पद्धतीने पाटील – कुलकर्णी यांची नेमणूक केलेली होती. त्यामुळे पाटील- कुलकर्णी यांचेकडे गाव- गाड्यातील गावकीची कामे करणारे शेषाप्पा, गेंदा , येताळा हे हर कामे शिपाई म्हणून काम करीत असत ते पाटील- कुलकर्णी यांचे विश्वासू व प्रामाणिक असलेमुळे त्यांची नेमणूक “जागल्या”(पहारेकरी) म्हणून करणेत आलेली होती. शेषाप्पा, गेंदा, येताळा हे आटगांवच्या गांव कुसाच्या बाहेरील पूर्वश्रमीच्या महार समाजाच्या वस्तीत बायका- पोरांसह राहत असत. पाटील-कुलकर्णी यांनी गावच्या संरक्षणासाठी “जागल्या” पहारेकरी प्रमुख म्हणून शेषाप्पा तराळावर जबाबदारी दिलेली होती. गेंदा व येताळा यांना शेषाप्पाचे साथीदार म्हणून निवडण्यात आलेले होते, त्यामुळे शेषाप्पा हा आपल्या दोन साथीदारांना घेऊन रात्रीच्या वेळी गांवात गस्त घालून पहारा देत असत. पहाटे गावचे पाटील यांना गस्तीची खबर बात देऊन ते सकाळ झालेनंतर नेमलेल्या गांवच्या कुळवाड्याकडे शेतीच्या कामासाठी जात असत. दुपारी “तक्यात” (समाज मंदिर) विश्रांती घेत असत व पुन्हा रात्रीच्या वेळी गांवच्या संरक्षणासाठी गस्तीवर जात असत, त्यावेळी ऐका हातात काठी व दुसऱ्या हातात उजेडासाठी दिवटी घेऊन रात्रभर चहूबाजूंनी फिरून गांवात गस्त घालत असत, त्यामुळे गावात चोरी होण्याचे प्रमाण पूर्णपणे थांबवले होते, त्यामुळे पाटील- कुलकर्णी हे समाधानी होते.
      आटगांवातील सुगीचा हंगाम संपलेनंतर अमावस्येच्या रात्री गावात ठराविक घरातच फक्त दाग- दागिन्यांची चोरी होऊ लागलेली होती, दर अमावस्याला हमखास गांवातील कुणाच्यातरी घरी चोरी होत असलेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरत चाललेले होते. चोर हा माळवदी घराच्या वरच्या बाजूला उजेडासाठी ठेवलेल्या मोठ्या सवण्यातून रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून घरातील सोने-चांदी घेऊन पसार होत असे, चोर कोण आहे ? कुठून येतो ? कुठे जातो ? याचा थांग पत्ता कोणालाही समजत नव्हता. चोर हा अत्यंत हुशारीने चोरी करून शेषाप्पा व त्यांच्या साथीदारांना चकवा देऊन जात होता, त्यामुळे एवढ्या पहाऱ्यातून सुद्धा गांवात चोरी कशी होती, याची काळजी पाटील- कुलकर्णी यांना लागलेली होती. त्यामुळे पाटील- कुलकर्णी यांनी गावच्या चावडीत शेषाप्पास  बोलावून चोरीबाबत जाब विचारून म्हणाले, गावात तुम्ही गस्त व्यवस्थित घालत नाही का ?  चोऱ्या कशा होतात ?  याद राखा !  इथून पुढे गावात चोरी झाली तर ?  आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल ?  त्यावेळी गावातील दिवाणजी हे सुद्धा चावडीत येऊन थांबलेले होते. दिवाणजी हे गावातील मोठे प्रस्थ होते. त्यांचे पणजोबा हे विजापूरच्या दरबारात दिवाणजी म्हणून काम करीत होते. त्यामुळे लोक त्यांना सुद्धा दिवाणजीच म्हणत असत, त्यामुळे गावात मोठा वाडा व जमीन जुमला भरपूर प्रमाणात होता, त्यामुळे गांवात त्यांच्या शब्दाला वजन होते, त्यावेळी दिवाणजी हे पाटील-कुलकर्णी यांचेकडे पहात म्हणाले, चोराला पकडणे हे शेषाप्पाच्या आवाक्यातील काम नाही, त्यापेक्षा संस्थांनकडील पोलीस हे गस्तीसाठी म्हणून मागून घेऊया, त्यावर पाटील म्हणाले, दिवाणजी गावात चोऱ्या कशा होतात याचा जाब आपल्याला संस्थानच्या राजेंना द्यावा लागेल, याचा विचार केला आहे का ? आपल्याला हे परवडणार नाही, आमचा विश्वास शेषाप्पावर पूर्ण आहे, तुम्ही काहीतरी सांगत बसू नका, त्यापेक्षा चोराचा बंदोबस्त कसा करायचा यावर आपण मार्ग काढूया. त्यानंतर दिवाणजी हे शांत बसले होते, त्यावेळी पाटील- कुलकर्णी हे शेषाप्पाकडे पाहत म्हणाले, यावेळी चोराला पकडायची हयगय होता कामा नये, तयारीला लागा असे म्हणताच, शेषाप्पा, गेंदा, येताळा यांनी पाटील – कुलकर्णी यांना जोहार घालून तक्याकडे चालत निघाले.
         शेषाप्पाने आपल्या समाजातील गेंदा, येताळा , मेघा, रावजी, लिंगा, कृष्णा, संभा, आग्रू  यांची गुप्त बैठक तक्यात घेऊन चोराला कसे पकडायचे याचे धोरण सर्वांना समजून सांगितले व म्हणाले, गावचे पाटील- कुलकर्णी यांनी गस्तीसाठी जादा माणसे  घेण्याचे सुद्धा सांगितले आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा सर्वजण गस्तीवर आमचे बरोबर येण्याचे आहे, अमावस्येच्या रात्री गावात चोर दिसले नंतर सांकेतिक भाषेत पक्षाचा व प्राण्याचा आवाज कसा काढायचा हे लिंगा व आग्रू कडून समजून घेतलेले होते व चोराला पकडण्याची खलबते करून निर्धार केला होता. त्यानंतर पाटील-कुलकर्णी यांची मान्यता घेऊन शेषाप्पाने अमावस्येच्या रात्री गावात महत्वाच्या रस्त्यावर ठिक-ठिकाणी दिवट्यांच्या (मशाल) उजेड केलेला होता. गावच्या वेशीच्या आतमध्ये पहाऱ्यासाठी  माणसे उभी केलेली होती. गावच्या उत्तर वेशीवर गेंदा, पश्चिम वेशीवर- येताळा, पूर्व बाजूला आग्रू , दक्षिणेला लिंगा यांचेवर जबाबदारी दिलेली होती आणि शेषाप्पा स्वतः गावात चहूबाजूनी  फिरत होता. प्रत्येकाच्या हातात घुंगराची काठी दिलेली होती, गावात सक्त खडा पहारा शेषाप्पाने उभा केलेला होता. गावचे पाटील अधून-मधून  घोड्या वरून येऊन गस्तीवरच्या लोकांची भेट घेऊन माहिती घेत असत व सूचना करीत असत. शेषाप्पाने गावातील आपला मित्र रसूल मुलाणीस सुद्धा आवर्जून रात्रीच्या पहाऱ्याच्या  मदतीसाठी बोलावून घेतलेले होते, कारण रसूल मुलाणीकडे त्यांचा स्वतःचा घोडा होता, वेळप्रसंगी घोड्याचा वापर करता येईल, असा भरवसा शेषाप्पास होता. आज कोणत्याही परिस्थितीत चोर पकडायचा हा निर्धार केलेला होता.
साधारण अमावस्येच्या मध्यरात्रीनंतर पश्चिम बाजूकडून सांकेतिक भाषेतील मोराचा व साळुंकीचा आवाज येऊ लागलेनंतर गस्तीवरील सर्वजण सावध झाले. शेषाप्पाने गस्तीवर असणाऱ्या दोघा-तिघांना सोबत घेऊन गावच्या पश्चिम बाजूला पळत सुटले होते. इतर जागले सुद्धा आवाजाच्या दिशेने येऊ लागले होते. गावच्या पश्चिम बाजूच्या वेशीच्या बाहेर शेषाप्पा रात्रीच्या अंधारात चोर पळताना पाहताच आपल्या हातातील काठी त्यांच्या पायावर फेकून मारली, त्यावेळी चोराच्या पायास काठीचा तडाका लागतात, चोर जमिनीवर पडलेला होता परंतु तो त्याही परिस्थिती उठून पळत होता, चोर पळत असतानाच त्याने पायाने दगड उचलून घेऊन शेषाप्पाच्या दिशेने भिरकावीला होता,शेषाप्पा सावध असलेमुळे त्याने दगड चुकविलेला होता,चोर पुढे पळत होता, शेषाप्पा त्याच्यामागे पळत होता, चोराने अंदाज घेऊन कमरेला बांधलेला चाकू काढून शेषाप्पाच्या दिशेने मारलेला होता, चोराने एवढ्या ताकदीने व चलाखीने  मारलेला चाकूचा वार सुद्धा शेषाप्पाने चुकविलेला होता, तो चाकू नेमका जांभळीच्या झाडात घुसलेला होता, शेषाप्पाचे नशीब बलवंतर म्हणून तो वाचला होता. चोराने चोरलेले सोने- चांदी,नाणी ते त्याने धोतराच्या धडप्यात बांधलेले गाठोडे त्याने कमरेला रस्सीने जाम बांधून तो पळत होता.
शेषाप्पाने जोरात पळत जाऊन, चोराच्या अंगावर झडप घालून, त्याला खाली पाडले होते. शेषाप्पाने चोराचे निरीक्षण केलेवर दिसून आले की, चोराने तोंड पूर्णपणे काळे केलेले होते, त्यामुळे रात्रीच्या अंधारात त्याचा चेहरा ओळखता येत नव्हता, चोराने संपूर्ण अंगाला तेल लावलेमुळे पकडायला गेले तर तो हातात येत नव्हता, त्याही परिस्थितीत चोराने शेषाप्पाला ढकलून दिले व उठून पळत निघाला, त्यावेळी चोराने शेषाप्पाच्या पायाच्या नडगीवर नेमका अचूक दगड मारलेमुळे शेषाप्पा हा तालीवरून पाय घसरून खाली पडला होता, तेवढ्या वेळेत चोर गायब झाला होता, तोपर्यंत शेषाप्पाचे सर्व साथीदार त्याच्या जवळ आलेले होते. अंधारात काहीच दिसत नव्हते. रसूल मुलाणी सुद्धा हातात मोठा सुरा घेऊन पळत आलेला होता. त्यांनी आपल्या हातातील दिवट्या पेटवून चोराचा मागोसा सर्व जागेत फिरून घेतला होता परंतु चोर काही सापडला नाही सर्वजण हताश होऊन चावडीवर येऊन थांबले होते.
        गांव चावडीत पाटील-कुलकर्णी यांचे बरोबर गावातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी सुद्धा उपस्थित होती. इनामदार यांच्या घरात चोरी झालेली होती. त्यांच्या घरातील माणसे हजर होते. इनामदारांच्या घरात चोरी झाल्याची खबर पंचकोशीत पसरली होती. त्यामुळे चावडीवर लोकांची गर्दी झालेली होती. गावचे पाटील यांनी शेषाप्पा कडून चोराची माहिती समजून घेत असताना गर्दीतून अनेकांनी गावात चोरी होत आहे याबाबत नाराजी व्यक्त करीत होते. त्यावेळी दिवाणजी म्हणाले, आम्ही मागच्या वेळीच सांगितले होते की, चोराला पकडणे एवढे सोपे काम नाही, चोर हा जागल्या पेक्षा सव्वाशेर आहे, त्यापेक्षा संस्थांनकडील पोलीस बंदोबस्त मागून घेऊ या, शेषाप्पा व त्यांच्या साथीदारांना चोर सापडणार नाही, त्यापेक्षा त्यांची गावकीच्या कामावर परत नेमणूक करा, त्यावर कुलकर्णी दिवाणजीकडे पहात म्हणाले, गावच्या संरक्षणासाठी आम्ही काय करायचे ठरवू , संस्थांच्या राजांना काय उत्तर द्यायचे आहे ते आम्ही देऊ, त्यांची काळजी तुम्ही करू नका, त्यापेक्षा चोर कसा पकडायचा यासाठी मदत करा असे म्हणतात, दिवाणजी शांत झाले होते, त्यावर पाटील म्हणाले, चोराबाबत नेमके काय घडले हे आम्हाला कळेल का ?  त्यावर शेषाप्पा म्हणाला चोर आमच्या टप्प्यात आलेला होता, परंतु ही सर्व माहिती मी गर्दी समोर सांगू शकत नाही, गावचे पाटील- कुलकर्णी यांचे समोरच सांगितली जाईल, त्यावर गर्दीतून एक जण म्हणाला, दर अमावस्याला गावात चोरी होत आहे, लोकांचे दाग- दागिने, नाणी लुटले जात आहेत याचे काय करायचे, चोर तुमच्या हातावर तुरी देऊन पळून जातोय, एवढ्या जागल्याचा उपयोग काय. त्यावर पाटील सर्वांना शांत करीत म्हणाले, तुम्हाला जशी काळजी आहे तसे आम्हाला सुद्धा गावची काळजी आहे, तुम्ही आता सर्वजण आप-आपल्या घरी जावा. गावच्या चोरीबाबत आम्हाला विचार करू द्या, पाटील असे म्हणतात सर्वजण आपल्या घरी निघून गेले.
गावच्या चावडीत गंभीर शांतता पसरली होती, त्यावेळी पाटील- कुलकर्णी म्हणाले, बोल शेषाप्पा, तुला काय सांगायचे आहे का, त्यावर शेषाप्पा म्हणाला, चोर आमच्या हातून निसटला आहे हे खरे आहे, चोराने त्याचा चेहरा पूर्ण काळा केलेला होता, अंगाला पूर्ण तेल लावलेले होते, ज्यावेळी चोराची व माझी झटापट झाली होती, त्यावेळी माझ्या लक्षात काही गोष्टी आलेल्या आहेत, परंतु माझ्याकडे पुरावा नसलेमुळे मी बोलू शकत नाही. तो चोर दिवाणजीच्या शेतातील मोठ्या ताली जवळ गायब झालेला आहे. मला थोडा अंदाज आलेला आहे. येत्या अमावस्येला त्याचे उत्तर आपणास पुराव्यासहित देईल. त्यावर पाटील म्हणाले, येत्या अमावस्येला चोर सापडला नाही तर तुम्हाला जागल्याचे (पहाऱ्याचे) काम सोडावे लागेल व पुन्हा गावकीचे काम करावे लागेल हे करण्यापेक्षा आजच मी नवीन जागल्याची नेमणूक करतो, कारण गावात चोरीमुळे भीतीचे वातावरण झालेले आहे. त्यावर शेषाप्पा हात जोडून म्हणाला, माय-बाप एक वेळ आम्हाला संधी द्या, आम्हास डाग लाऊ नका, आमच्यावर विश्वास ठेवा, त्यावर कुलकर्णी व पाटील यांनी थोडा वेळ विचार करून म्हणाले, तुम्हाला संधी दिली तर पुढच्या अमावस्येला चोराचा निकाल लागला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला आमच्याकडून परवानगी आहे, असे म्हणताच शेषाप्पा पुन्हा हात जोडून म्हणाला, अमावस्याला चोर सापडला नाही तर मी स्वतः व माझे साथीदार हे गावच्या पहाऱ्यावरून बाजूला होतो व पुन्हा गावकीची कामे करतो हे वचन आहे. त्यानंतर गुप्त चर्चा झाली. पुन्हा चोराला पकडण्याची संधी दिलेबद्द्ल मनापासुन आभार मानून सर्वांनी जोहार घालून चावडीच्या बाहेर पडले होते.
शेषाप्पाने दोन दिवस पूर्ण विचार करून गेंदा व येताळास सोबत घेऊन दिवाणजीच्या शेताजवळील संपूर्ण जमिनीची पाहणी केली, त्यावेळी त्यास असे दिसून आले की, दिवाणजीच्या शेतातील तालीजवळ अनेक लिंबे, हळद-कुंकू लावून टाकली होती. दगडी मोरी जवळ परडीत हिरव्या बांगड्या, हिरव्या चोळीचे कापड त्यामध्ये खारीक- खोबरे, इलायची, पान, सुपारी, तांदूळ, हळद, कुंकाच्या पुड्या त्यात ठेवलेल्या होत्या. विहिरीजवळ कोंबड्याची पिसे पडलेली होती. त्यामुळे गावातील लोक म्हणत असत की, दिवाणजीच्या शेतातील दगडी मोरीजवळ भुताटकी आहे, अशी गावात चर्चा चालत होती. त्यामुळे गावातील गुराखी सुद्धा दिवाणजीच्या शेताकडे जनावरे घेऊन फिरकत नसत. शेषाप्पा हा याबाबी बारकाईने पहात असताना त्यांच्या लक्षात आले की, मातीच्या मोठ्या पलानीत पावसाचे साठलेले पाणी जाण्यासाठी जी दगडी मोर बांधली होती, त्या मोरीस आडवा मोठा दगड लावलेला आहे व वरच्या बाजूने माती टाकून पलानीतील पाणी जाणारे बंद केलेले आहे. त्यामुळे शेषाप्पास कोडे उलगडेना, त्यामुळे त्याने पलानीचा मोरीचा दगड ताकदीने बाजूला केला, त्यावेळीस त्यास आश्चर्याचा धक्काच बसला होता, त्यावेळी गेंदा व येताळा हे आजूबाजूकडे पाहणी करीत होते, शेषाप्पाच्या लक्षात चोराचा उलगडा झाला, त्याने मोरीचा दगड पुन्हा त्याच जागेवर बसविले व लिंबाच्या झाडाखाली तंबाखू मळत बसला होता, त्यावेळी गेंदा म्हणाला, आर शेषाप्पा, आपल्यावर काय प्रसंग ओढवला आहे, गावात आपल्याबद्दल लोक चोर पकडता येत नाही, म्हणून चेष्टा करीत आहेत आणि तू निवांत तंबाखू खात आमच्याकडे बघून हसतोय काय. इथल्या भुताची लागण झाली का. त्यावर येताळा म्हणाला, आर गेंदा तू येडा आहेस का ? खुळा आहेस ? शेषाप्पाला काय तरी गोम समजल्या बिगार तो हसणार नाही, त्यावर शेषाप्पा म्हणाला, अरे गड्यांनो भुताची नेमकी जागा सापडली आहे,येत्या अमावस्येला पाखरू पकडायचेच असे म्हणताच, सर्वांच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी हास्य उमटले होते, ते विजयी मुद्रेने पुढच्या तयारीसाठी गावात चालत निघाले होते.
शेषाप्पाने चोरास पकडायची पूर्ण योजना गावच्या पाटील- कुलकर्णी यांना सांगितली व त्यांची सहमती घेऊन अमावस्येच्या अगोदर पाठीभर हिंग, बिबे, कोळशाची भुकटी, राख, दोन शेर करडईचे तेल, रुईच्या झाडाच्या फांद्या त्याच बरोबर बाबळी व बोराटेचे काट्यांचे फेस, दोरखंडाचे मोठे जाळे तयार करून ठेवले होते. त्याच बरोबर दोरखंडाचा कासरा व रस्सी सुद्धा तयार करून घेतलेल्या होत्या तसेच दहा ते बारा दिवट्या तयार ठेवलेल्या होत्या व अमावस्येच्या दिवसाची वाट पाहत बसले होते. अमावस्याचा दिवस सुरू झाला, रात्रीच्या वेळी भीतीचे वातावरण गावात पसरलेले होते. कुत्र्याच्या ओरडण्याने त्यात भरच पडत होती. घरातील दरवाजा उघडताना व बंद करताना करकर आवाज सुद्धा बेसूर वाटत होता, नदीवरच्या टिटव्याचा कर्कश आवाजामुळे रात्रीचे बेसूर वातारवण झाले होते. त्यामुळे घराच्या बाहेर कोणीही पडत नव्हते, गावातील लोकांना वाटत होते की, आज रात्री भूत कोणाच्या घरी चोरी करणार याचीच चर्चा घरा-घरात होत होती. गाव भितीच्या विळख्यात होते. पाटील-कुलकर्णी हे सुद्धा अमावस्यांच्या रात्री सावधगिरीने बारकाईने खलबत्ते करीत होते.
शेषाप्पाने अमावस्येच्या रात्री गावात गस्तीसाठी कृष्णा,सैदा व रावजी यांनाच ठेवले होते आणि रात्रीच्या दुसऱ्या पहारी शेषाप्पाने दिवाणजीच्या शेताजवळील लिंबाच्या व जांभळीच्या झाडावर वरती येताळा, गेंदा,आग्रू,मेघा,लिंगा, संभा यांना झाडावरती बसविले होते व शेषाप्पा स्वतः दगडी मोरीजवळ आडोशाला दबा धरून बसलेला होता. रात्री साधारण तिसऱ्या पहरी गावच्या बाजूंनी कोल्हासारखा ओरडण्याचा आवाज सांकेतिक भाषेत येऊ लागल्यावर शेषाप्पा व त्यांचे साथीदार सावध झाले होते. आता ते सावजाची वाट डोळ्यात तेल घालून पाहू लागले होते. त्यावेळेस गावच्या बाजूंनी काळ्याकुट अंधारातून एक उघडा बंब, उंची पुरी व्यक्ती ही मागे पुढे पाहत दबक्या पावलांनी चालत येत होता. त्यावेळी गेंदाने मांजरीचा आवाज काढताच, शेषाप्पा तयारच होता. सदरची व्यक्ती दगडी मोरीजवळ येऊन दगड बाजूला करीत असतानाच, शेषाप्पाने त्याच्या अंगावर दोरखंडाचे जाळे टाकले आणि त्याने इशारा करताच झाडावर बसलेल्या शेषाप्पाच्या साथीदारांनी त्याच्या अंगावर उड्या टाकल्या व चोराला पकडून जेरबंद केले, काही साथीदारांनी मशाली पेटविल्या होत्या, त्या उजेडाच्या जाळ्यात पकडलेल्या त्या उघडबंब व्यक्तीस उचलून जवळच्या जांभळीच्या झाडाला कासाऱ्याने बांधले आणि त्या जाळ्यातून चोरास बाहेर काढून त्याचे रस्सीने हात-पाय मजबूत बांधले, पकडलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर घागरीवर पाणी ओतले, त्याचा सगळा चेहरा पुसून घेतला, त्यावेळी शेषाप्पाने मशालीच्या उजेडात चोरास ओळखले, त्यास पाहताच शेषाप्पा म्हणाला, अरे हा तर बंड्या चोर आहे, असे म्हणताच, गेंदा व येताळा यांनी दात-ओठ खात बंड्या चोरास लाथा- भुक्क्याने मारू लागले होते परंतु त्या माराचा बंड्या चोरावर काहीच परिणाम होत नव्हता.
बंड्या चोर सर्वांकडे रागाने पहात म्हणाला, मला मुकाट्याने सोडा. नाही तर याचे परिणाम वाईट होतील असे म्हणताच, शेषाप्पाने चोराच्या चेहऱ्यावर हाताने ठोसा मारताच, बंड्या चोर हा शेषाप्पाच्या चेहऱ्यावर थुकला, त्यावेळी आग्रूने त्यांच्या पायावर काठीचा जोरात फटका मारला होता, थोड्यावेळाने शेषाप्पा बंड्या चोरास विचारू लागला तू गावातील लोकांच्या घरातील चोरलेले दाग-दागिने, नाणी कुठे ठेवली आहेत, तुझे किती साथीदार आहेत, तुझ्या पाठीमागे कोण आहे, याची माहिती बऱ्या बोलाने दिली तर बरे होईल असे शेषाप्पाने अनेक वेळा विचारले परंतु बंड्या चोर हा ताकास तूर लागू देईना, त्यावेळी शेषाप्पा आपल्या साथीदाराकडे पहात म्हणाला, हा असा तयार होणार नाही. शेषाप्पाने इशारा करताच, येताळाने फडक्यात ठेवलेले बिबे बाहेर काढून ते गरम करून बिब्यास चाकूच्या धारेने कापून बंड्या चोराच्या अंगावर बिबे फिरवू लागला, रुईचा चीक टाकला, त्यामुळे बंड्याच्या अंगावर बिबे उतू लागले होते, त्यानंतर बंड्या चोरास सराट्याच्या काट्यावर झोपवले असता, बंड्या चोर हा जोर-जोराने ओरडू लागला होता. परंतु बंड्या चोरावर याचा काहीच परिणाम होत नव्हता, तो कसलेला चोर होता. शेवटी शेषाप्पाने इशारा करताच गेंदा व येताळाने बंड्या चोराचे  हात- पाय धरून त्यास जवळच ठेवलेल्या बाभळीच्या व बोराटेच्या काट्याच्या फेसावर उचलून टाकला. त्यामुळे बंड्या चोराच्या अंगात अनेक काटे घुसून त्यातून रक्त येऊ लागले होते, अगोदरच बिब्याने, सराट्याच्या काट्याने, रुईच्या चिकाने त्यास त्रास होत होता व आता बाभळीच्या व बोराट्याच्या काट्याने त्याच्या शरीराची चाळण होऊ लागली होती, त्यास असह्य वेदना होऊ लागल्या होत्या, त्यामुळे बंड्या चोर हा शेषाप्पाला म्हणाला, मला या काट्याच्या फेसातून बाहेर काढा, मी तुम्हाला सगळी माहिती खरी सांगतो, असे म्हणताच बंड्या चोरास काठ्याच्या पेसातून बाहेर काढले, त्याच्या अंगास काटे टोचलेले ठिकाणातून रक्त येत होते, नाईलाजाने त्याने चोरीची सत्य घटना सांगितली, म्हणाला हे चोरलेले सर्व दाग-दागिने, नाणी हे दिवाणजीच्याकडे नेहून देत होतो. गावात चोरी करून आलेनंतर दगडी मोरी पासून त्याच्या घरापर्यंत भुयार केलेले आहे. त्या भुयारातून मी दिवाणच्या घरापर्यंत जात असे व त्याच्याकडे चोरलेले धन जमा करीत असत व चोरलेले सोने- चांदी , नाणी हे दिवाणजी तळघरात ठेवलेले आहेत. बंड्या चोराने ही माहिती देताच, शेषाप्पाने आग्रुस सांगितले गावचे पाटील- कुलकर्णी यांना जाऊन ही खबर द्या व त्यांना दिवाणजी च्या घरी घेऊन जा, त्या ठिकाणी चोरलेला धनाचा पुरावा मिळेल व दिवाणजीच्या तळघरातील सोने- नाणे व दिवाणजीला ताब्यात घ्या, त्यासाठी मी गेंदाला भुयारातून पाठवीत आहे व आम्ही बंड्या चोरास घेऊन चावडीवर जात  आहे, जावा लवकर असे सांगतात, आग्रू गावाकडे जोरात निघून गेला.
त्यानंतर शेषाप्पाने ठरलेल्या नियोजनाप्रमाणे गेंदाच्या अंगास तेल लावले, कोळशाची भुकटी ओली करून त्याच्या तोंडावर लावली, बंड्या चोराने आज चोरलेले दागिने एका फडक्यात बांधून घेतले व दुसऱ्या फडक्यात नदीतील  दहा-बारा गारगोट्या गोळा करून त्या फडक्यात बांधून गेंदास भुयारात दिवटी घेऊन पाठवले. बंड्या चोराने सांगितल्याप्रमाणे गेंदा हा भुयारात गेल्यानंतर पेटती दिवटी हातात घेऊन भुयारात प्रवेश करून चालत निघाला, भुयारातील सर्व दिवट्या तो विजवत चालला शेवटी तो भुयारातील पायरीवर गेल्यावर दगडाच्याच फटीतील लाकडी गोल दांडा  फिरविल्यानंतर आपोआप दिवाणजीच्या तळघराचा दरवाजा उघडला आणि तो तळघरात पोहोचला होता, त्याने तळघरातील दिवटी पेटवली आणि उजेडात पाहिले तर दिवाणजी हा लाकडी पेटीवर बसलेला होता, दिवाणजीचा आवाज आला तसा गेंदा घाबरला होता, परंतु धाडसाने त्याच्या जवळ जाऊन उभा होता, बंड्या चोराचा वेश जसा होता तसाच वेश गेंदाने केले मुळे दिवाणजी ओळखू शकला नाही, गेंदाने कमरेला बांधलेले फडक्याचे गाठोडे दिवाणजीच्या हातावर ठेवताच, तळघरात घराच्या वरच्या बाजूंनी पाटील- कुलकर्णी ग्रामस्थ व पहारेकरी तळघरात येतात दिवाणजीच्या चेहऱ्याचा रंग बदललेला होता. त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्याच्या अंगास दर-दरून घाम येऊ लागला होता. अंग थर-थर कापायला लागलेले होते. दिवाणजी पुराव्यासह पकडलेमुळे त्यांची वाचा बंद झालेली होती. गावचा चोर आज सापडला होता. पाटील- कुलकर्णी यांनी आदेश देताच, पहारेकऱ्यांनी दिवाणजीस ताब्यात घेतले, चोरलेल्या सोन्या- नाण्यांची लाकडीपेटी ताब्यात घेतली, दिवाणीजीचे हात बांधून त्यांची वरात चावडीकडे निघाली, पहाटे गावच्या आसमंतात लाली उजळली होती. सूर्योदयाची वेळ झालेली होती, बंड्या चोरास सुद्धा तोपर्यंत चावडीत आणले होते, दिवाणजीची व बंड्या चोराची नजरा-नजर झाली, दोघांनीही माना खाली टाकल्या होत्या, चोरीचा दोघांनीही गुन्हा कबूल केला होता. शेषाप्पा तराळाने व त्याच्या साथीदारांनी अखेर बंड्या चोर पकडला आहे, ही वार्ता जसा सूर्य वर येत जाईल तशी गावात व पंचक्रोशीत पसरलेली होती, त्यामुळे सर्व गाव चावडीवर बंड्या चोरास पाहण्यासाठी आलेले होते, कारण अमावस्येच्या रात्रीचे चोरी करणारे खवीस भूत कसले आहे हे पाहण्यासाठी गर्दी झालेली होती. गावावरचे संकट गेले म्हणून सर्वजण समाधानी  होते. दोन दिवसांनी पाटील- कुलकर्णी,शेषाप्पा,पहारेकरी यांनी बंड्या चोर व दिवाणजीस घेऊन संस्थांनच्या राजधानी गावात दाखल झालेले होते.
आयु.विलास खरात 
लेखक- आटपाडी जि.सांगली

इतरांना शेअर करा