मराठा समाजातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाचा मार्ग स्वीकारून आपली उन्नती साधावी असा सल्ला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मराठा तरुणांना दिला. मराठा महासंघ शाखा भिगवण संचलित छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाचे वतीने शिवजयंती निमित्त भिगवण येथील शिवरत्न कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित केलेल्या राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. दीपिकाताई क्षीरसागर, प्रमुख वक्ते प्रसिद्ध कवी अनंत राऊत व प्रमुख पाहुणे म्हणून मराठा महासंघाचे संयुक्त सरचिटणीस गुलाब दादा गायकवाड यावेळी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की पूर्वी मराठा समाजातील कर्जदार कर्जाची परतफेड करीत नाही असा समज होता, परंतु अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या जवळपास सर्व कर्जाची परतफेड मराठा तरुणांनी केली, ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे मराठा समाजाची याबाबत काहीशी मलीन झालेली परिस्थिती सुधारली आहे. आपली आर्थिक उन्नती साधण्याकरिता महामंडळाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त तरुणांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महासंघाचे मार्गदर्शक विराज माने, मानसिंगतात्या जाधव, अर्जुन बापू शिरसाट, प्रा रामदास झोळ, राजेंद्र धांडे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन जयप्रकाश खरड त्यांनी तर प्रास्ताविक मराठा महासंघाचे इंदापूर तालुकाध्यक्ष राजकुमार मस्कर यांनी केले.