महा आवाज News

भारतरत्न,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर!

आटपाडी, सोलापूर,माणदेश येथील लोकां विषय किती जिव्हाळा होता, एक आठवण,14एप्रिल ला जयंती आहे, विशेष लेख!
प्रतिनिधी  :सुधीर पाटील 
आटपाडी 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर असलेले सांगली जिल्ह्यातील आटपाडी हा तालुका आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आटपाडी हा भाग औंध संस्थानात होता, त्यास “आटपाडी महाल”  असेही म्हणत असत. सदरचा आटपाडी भाग हा कायमस्वरूपी दुष्काळी छायेत असलेमुळे हा भाग उजाड माळरानाचा पिवळसर, मुरमाड मातीचा, जमिनीचा भू-भाग होता. अशा या आटपाडीत गाव कुसाच्या बाहेर राहणारे पूर्व श्रमीचे महार समाजातील लोकांची वस्ती होती. अशा या वस्तीत गाव-गाड्यातील गावकीच्या कामातूनही परमपूज्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सतत चिंतन व मनन करणारे अस्पृश्य समाजातील लोक होते. अशा आटपाडी येथील पूर्व श्रमीच्या महार समाजातील लोकांनी प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समक्ष दर्शन घेऊन ते धन्य झाले. त्यांच्या आयुष्याचे सार्थक झाले असे ते मनोमन मानित होते. विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरच्या तीन आठवणी आपणापुढे कथन करीत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे दिनांक ३१ डिसेंबर १९३७ साली महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा व दलित परिषद आयोजित करणेत आलेली होती. याबाबतची वार्ता सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात सर्वत्र पसरलेली होती. या बातमीची खबर आटपाडी येथील पूर्वश्रमीच्या महार समाजातील कारभारी मंडळीच्या कानावर पडलेली होती. त्यामुळे त्यांना अत्यानंद झालेला होता. त्यांनी ठरविले की पंढरपूर येथे डॉ. बाबासाहेबांना समक्ष जाऊन पहायचे होते. कारण मुंबईहून येणारे आटपाडीकर हे येते वेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ‘मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता’ ही  वर्तमानपत्रे सोबत घेऊन येत असत व आटपाडीच्या ‘तक्त्यात’ (समाज मंदिर) रात्रीच्या वेळी दिवटी अथवा कंदीलाच्या उजेडात वाचून घेत असत. त्यामधील डॉ.बाबासाहेबांची भाषणे, बातम्या वाचून त्यांच्या विचारामध्ये परिवर्तन घडू लागलेले होते. त्यामुळे बाबासाहेबांना पाहण्याची तीव्र भावना त्यांच्यामध्ये जागृत झालेली होती. त्यामुळे आटपाडीच्या तक्त्यामध्ये पूर्वश्रमीच्या महार गड्यांची बैठक समाज्याचे कारभारी यांनी बोलविली होती. आटपाडी तक्त्यातील बैठकीमध्ये सर्वानु मते ठरविण्यात आले होते, की प्रत्येक घरातील एक जन पंढरपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सभेसाठी व परिषदेसाठी गेले पाहिजे, त्यास  सर्वांनी सहमंती दिली होती.
दिनांक ३०डिसेंबर १९३७ रोजी पहाटे कोंबडे आरवले (बांग) नंतर सर्वजण पूर्वश्रमीचे महार गडी तक्त्याच्या मोकळ्या जागेत एकत्र जमा झाले, त्यामध्ये पांडा, धोंडी, महादू, येताळा, सदा, मेघा, आबा, दादू, कृष्णा, अण्णा, रावजी, मसू, दाजी, मारुती इत्यादी हे सर्वजण आभाळातील चांदण्याच्या मंद प्रकाशात पंढरपूरला येणाऱ्या आपल्या प्रज्ञा सूर्यास पाहण्यासाठी पहाटे चालत निघालेले होते. त्यावेळी दळणवळणाची सोय नव्हती. पंढरपूरला जाणेच्या आदल्या दिवशी आटपाडीच्या ओढ्यातील पाण्यात आपल्या अंगावरील कपडे हिंग लावून धुऊन घेतलेली होती. त्यांनतर तक्यात पारावरील लिंबाच्या झाडाखाली आप-आपसात केस कापून घेऊन हजामती करून घेतलेल्या होत्या. त्यात सैदा हा लंगोटीवरच पंढरपूरच्या सभेला येतो असा म्हणायला लागला होता. कारण तो हमेशा लंगोटीचाच वापर करीत असे, परंतु त्याची समजूत काढून त्यास अंगात जुनी बंडी व धोतर घालायला भाग पाडलेले होते पंढरपूरला जाणाऱ्या सर्वांच्या अंगावरील बंडी, सदरा, धोतर हे अनेक ठिकाणी फाटलेले होते. परंतु डॉ. बाबासाहेबांच्या सभेसाठी त्यांनी ओढ्याच्या पाण्यात अंगावरील कपडे स्वच्छ धुऊन घेतलेले होते. पंढरपूरकडे जाते वेळेस प्रत्येकाच्या हातात डोक्याएवढी काठी सोबत घेतलेली होती त्या काठीला मोठ्या फडक्यात भाकरी, खर्डा बांधून घेतलेला होता. काहींनी बंडीच्या व सदऱ्याच्या खिशात मटकी घेतलेली होती, कारण चालताना मटकीचा वापर खाण्यासाठी करता येईल या उद्देशाने घेतलेली होती.
दिघंचीच्या माण नदीजवळ सूर्योदयाची लाली दिसू लागलेली होती. परंतु तिथेही न थांबता सरळ धाकट्या  महुदा पर्यंत चालत गेले. महूद ते सोनकेच्या रस्त्यालगत असणाऱ्या मोठ्या झाडाखाली बसून खर्डा- भाकर खाल्ली व ओढ्यातील पाणी पिऊन ते पुन्हा चालत निघाले. त्यावेळेस विठलापूर, दिघंची, उंबरगांव, महूद या गावातील पूर्वश्रमीचे महार  गडी पंढरपूरच्या सभेसाठी व परिषदेसाठी सामील झालेले होते. दिवस मावळण्याच्या पूर्वीच त्यांनी पंढरपुरात प्रवेश केला होता. त्यानंतर आटपाडीच्या कारभाऱ्यांनी राहणेबाबतची चौकशी केलेनंतर त्यांना सांगितले की, संत चोखामेळा धर्म शाळेत राहण्याची सोय केली आहे. त्यानुसार ते संत चोखामेळा धर्म शाळेत गेले तर त्या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली होती. सर्वजण हे बाबासाहेबांची सभा ऐकण्यासाठी मंगळवेढा, सांगोला, जत, मोहोळ, बार्शी, करमाळा, इंदापूर, बावडा या गावचे लोक सुद्धा प्रचंड संख्येने सभेसाठी आलेले होते. त्यामुळे आटपाडीचे गडी धर्मशाळेच्या मैदानात झोपी गेले होते. वास्तविकता महाराष्ट्रातून पंढरपूरला वारीसाठी येणाऱ्या अस्पृश्य मंडळींसाठी च्या निवासासाठी सन १९२० साली संत चोखामेळा धर्मशाळा पंढरपूर येथे बांधलेले आहे.
दिनांक ३१ डिसेंबर १९३७ चा दिवस उजाडले नंतर आटपाडीच्या पूर्वश्रमीच्या महार गड्यांनी पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत जाऊन आंघोळ केली. सोबत आणलेल्या भाकरीचे सगळे तुकडे झालेले होते. ते खाऊन, पाणी पिऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभेच्या ठिकाणी म्हणजे संत गाडगे महाराज मठाच्या पाठीमागील मोकळ्या मैदानावर सभा होती, त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. डॉ. बाबासाहेबांचे जवळून दर्शन घडावे, या उद्देशाने सभा मंडपा शेजारीच जाऊन बसलेले होते. डॉ. बाबासाहेब हे कुर्डूवाडीहून ते करकमला गेले होते. तिथे वन जमिनी ह्या भूमिहीनांना मिळाव्यात अशी तिथल्या लोकानी मागणी केलेली होती. त्या ठिकाणी छोटे खाणी सभा झाली. त्यानंतर मातंग समाजाच्या वतीने सुद्धा सभेचे नियोजन केले होते. तिथली सभा आटपून डॉ. आंबेडकर हे पंढरपूर येथील सभेस आलेले होते. त्यावेळी पंढरपूरच्या दगडी फुलावार डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांना पाहणेसाठी व स्वागतासाठी भरपूर गर्दी झालेली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे  सभेच्या ठिकाणी आगमन होताच, लोकांनी जल्लोषात जयजयकार केला. डॉ. बाबासाहेब हे भाषणास उभे राहताच लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला, व जयजयकराच्या घोषणा देत होते. त्यांचे भाषण सुरू झाले ते ऐकून उपस्थित समुदायास हर्ष उल्हास झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड, जीवा पायदाळ,  आमदार सोलंकी (गुजरात),  रामा पाल (मुंबई), सिद्राम बाबर, पटवर्धन वकील, सर्वगोंड (पंढरपूर) हे उपस्थित होते. पंढरपूर येथील सभा संपलेनंतर आटपाडीचे पूर्वश्रमीचे महारगडी हे पुन्हा चालत आटपाडीस आले होते. त्यांनी आटपाडीच्या तक्त्यात पुन्हा बैठक घेतली व पंढरपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभेचा वृत्तांत तसेच दलित परिषदेतील सर्व ठरावाची माहिती सर्वांना सांगितली. त्यानंतर आटपाडीच्या पूर्वश्रमीच्या लोकांनी बैठकीत ठरविले की, आपली सर्व मुले शाळेत घातली पाहिजेत, अंगावर स्वच्छ कपडे घालायचे व गावकीची सर्व कामे बंद करायची असा निर्णय आटपाडीच्या तक्यात सर्वानुमते घेणेत आलेला होता. त्यानंतर तीन ते चार महिने पंढरपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाची चर्चा आटपाडी परिसरात व तक्यात  करीत होते.
सन १९४२  साली आटपाडी येथील पूर्वश्रमीच्या महार लोकां बाबतचा दुसऱ्या  एका प्रसंगाची आठवण सांगण्यात येते. सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा १५ फेब्रुवारी १९४२  रोजी दहिवडी येथील पूर्वश्रमीच्या महार समाजाच्या समाज मंदिरासमोरील मोकळ्या मैदानात सभा आयोजित केलेली होती. त्याही सभेस आटपाडी येथील पूर्वश्रमीचे महार समाजातील लोक दहीवडीची सभा ऐकण्यासाठी चालत गेलेले होते. दहिवडीस जाते वेळीस म्हसवड येथील तक्यामध्ये मुक्काम करण्यात आला होता, पंढरपूर येथील ३१ डिसेंबर १९३७ च्या डॉ. बाबासाहेब यांच्या सभेमुळे आटपाडी येथील पूर्वश्रमीच्या महार समाजाने गाव- गाड्यातील गावकीची कामे करणे सोडून दिलेले होते. गावामध्ये रोजगार करून सन्मानाने जगू लागलेले होते. डॉ. आंबेडकरांचा संदेश होता, अस्पृश्य वर्गावर अन्याय, अत्याचार होत असले तर, खेडी सोडा व शहराकडे चला. त्यानंतर अस्पृश्य वर्गातील अनेकांनी मुंबई, पुणे शहराकडे प्रस्थान केलेले होते. त्याचप्रमाणे दहिवडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभेनंतर आटपाडी येथे बोर्डिंग स्थापनेचा निर्णय घेतलेला होता व आटपाडी व सांगोला भागातील अनेक गरीब कुटुंबातील मुलांना प्रवेश देऊन त्यांना शिक्षणाचे दरवाजे उघडलेले होते. सदर वस्तीगृहास डॉ.बाबासाहेब  आंबेडकर वस्तीगृह आटपाडी असे नाव देण्यात आलेले होते. पंढरपूर व दहिवडीच्या सभा तसेच मूकनायक, बहिष्कृतभारत, जनता या वर्तमानपत्रांनी आटपाडीच्या लोकांसाठी परिवर्तनाची दिशा देणाऱ्या  घटना ठरलेल्या आहेत.
साधारण सन १९५४-५५ सालामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुणे मुक्कामी आलेले असताना अॅड. शंकरराव खरात, मा. पी. टी. मधाळे- आमदार व आटपाडीतील पूर्वश्रमीचे महार समाजातील निवडक लोक यांनी पुणे येथील सर्किट हाऊस मध्ये भेट घेतलेली होती. त्यावेळी डॉ. बाबासाहेबांना सांगण्यात आले होते की, आटपाडी येथील डबई कुरणातील जमीन ही महार समाजास एक सालीच्या लागवडीसाठी अटी व शर्तीवर देण्यात आलेली आहे, परंतु सदर जमिनीवर झाडे असलेमुळे फॉरेस्टचे अधिकारी त्या जमिनीमध्ये मेहनत, मशागत, लागवडीसाठी जाऊ देत नाहीत, अडथळा निर्माण करतात, याबाबत काय करावे, असे डॉ. बाबासाहेबांना विचारताच त्यांनी कागदपत्रे पाहून घेतली व म्हणाले, तुम्ही मे. कलेक्टर सांगली यांना लेखी अर्ज सादर करा व त्यात असे म्हणा की, सदरची जमीन मागासवर्गीय शेतकऱ्यांना लागवडीसाठी देण्यात आलेली आहे, तसे पत्र आम्हास दिलेले आहे, परंतु तुमचेच अधिकारी, सदर जमिनीत जाण्यास मनाई करतात, त्यामुळे सदर जमिनीवरचे झाडाच्या किमतींची कबूलायत करून घ्या अन्यथा तुमची सरकारी झाडे काढून घेऊन जावा किंवा ती झाडे आम्ही काढून घेतो. त्या झाडाच्या पंचनाम्याप्रमाणे जी रक्कम होईल ती भरण्यास तयार आहे, असा अर्ज सांगली कलेक्टर यांना सादर करा, त्यानंतर ही काही अडचण आली असेल तर, सांगा असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्यानंतर सांगली येथे मे. कलेक्टर यांना समाजाच्या वतीने लेखी निवेदन सादर केले होते. काही दिवसांनी सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारी झाडाचा पंचनामा करून त्यांचे पैसे भरून घेतले व जमिनीची कबुलायत करून दिलेली होती. त्यामुळे आटपाडी येथील पूर्वश्रमींच्या महार समाजास जमीन देण्यात आलेली आहे. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार कधीच विसरता येणार नाहीत.
परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवास आटपाडी येथील पूर्वश्रमीच्या महार लोकांनी त्या काळी समक्ष पाहिले त्यांच्या विचाराचे मनन, चिंतन करून स्वाभिमानाने जीवन जगत आहेत अशा या प्रज्ञा सूर्यास विनम्र अभिवादन !
                                                                  आयु.विलास खरात                                                          लेखक – आटपाडी जि.सांगली

इतरांना शेअर करा