प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. आज त्यांनी सहकार विभागातील आपला अतिरिक्त सहायक निबंधक पदाचा राजीनामा देत स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.
त्यामुळे त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आता त्या तुतारी हाती घेणार की मनोज जरांगे पाटलांचा अपक्ष झेंडा घेणार याकडे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण येथून महायुतीच्या माध्यमातून भाजपने माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. याआधी पंकजा मुंडे यांची बहीण प्रीतम मुंडे या खासदार होत्या. आता यावेळेस भाजपने प्रीतम मुंडेऐवजी पंकजा मुंडे यांना मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्लीत काम करण्याची संधी दिली आहे.
तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. पण, ज्योती मेटे या शासकीय सेवेत कार्यरत असून, त्या सहकार विभागात अतिरिक्त सहनिबंधक पदावर कार्यरत आहेत. लोकसभेची निवडणूक लढताना त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागणार होता.
त्यानुसार त्यांनी अतिरिक्त सहनिबंधक पदाचा राजीनामा देत स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. त्यांचा राजीनामा सहकार विभागाने स्वीकारला असल्याची माहितीदेखील समोर येत आहे. त्यामुळे ज्योती मेटे यांचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
त्यांच्या बीड लोकसभा निवडणूक लढवण्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाला आहे. आता ज्योती मेटे निवडणूक लढताना कोणत्या पक्षाची निवड करणार याची उत्सुकता आहे. त्या खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घेणार की, मनोज जरांगे पाटलांचा अपक्ष झेंडा ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.