प्रतिनिधी:- सुधीर पाटील..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशास स्वातंत्र्य मिळालेनंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देश भरातून फार मोठ्या प्रमाणात अभिनंदन व सत्कार करण्यात येत होते, त्यावेळीस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी फुलाचे हार न स्विकारता देशभरातून आलेल्या अनुयायांकडून व मान्यवर मंडळीकडून त्यांनी सूतगुंडी पासून तयार केलेले हार स्विकारत होते, त्यामुळे सत्काराच्या सुतगुंड्या ह्या लाखोच्या संख्येने जमा झालेल्या होत्या, त्यावेळी त्यांनी आपल्या अनुयांना, स्वातंत्र्य सैनिकांना व कार्यकर्त्यांना सूचना केली होती की, या जमा झालेल्या सुत गुंड्या (कॉटन यार्न) प्रत्येकाने भारतातील ग्रामीण भागात घेऊन जाऊन त्या सूतगुंडी पासून ग्रामीण भागात चरखा चालवून त्या सुतापासून पासून कपडे बनवून आपल्या देशातील गरीब व अर्ध नग्न अवस्थेत राहात असलेल्या जनतेला कपडे देण्यात यावीत, या त्यांच्या शब्दाखातर व सूचनेप्रमाणे देशभर सुत बनवणे व खादीचे कापड विणेच्या प्रयोजनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली होती.
त्यावेळीस महाराष्ट्रातील नांदेड, लोहरा, पुणे, मुंबई, वर्धा या पाच ठिकाणी सूतगुंडी पासून कापड विणेच्या संस्था स्थापन झालेल्या होत्या. विशेषता महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील “ मुल ” या खेडेगावात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वतः स्वहस्ते हात कताई चरख्या वर करून त्यांनी सुत काढणेची सुरुवात केलेली होती, त्याच धर्तीवर सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे खादी ग्रामोद्दोग भांडार सुरू करण्यात आलेले होते.
महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्र येऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदेशानुसार दिनांक २६/०१/१९४७ रोजी महाराष्ट्र सेवा संघाची स्थापना करून ती रजिस्ट्रेशन करून घेतली तिचा रजिस्ट्रेशन नंबर १५२० मुंबई- १९४७ असा असून सदर संस्थेचे मुख्यालय पुणे येथे स्थापन करणेत आलेले होते. महाराष्ट्र सेवा संघ हा भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सैनिकांनी स्थापन केलेला होता.
त्या महाराष्ट्र सेवा संघाने पहिले संचालक मंडळात १) श्री. शंकर दत्तात्रेय देव- अध्यक्ष -पुणे २) श्री.रघुनाथ श्रीधर धोत्रे- सभासद- वर्धा ३)श्री. केशव गणेश देवधर- सचिव- पुणे ४) श्री. अनंत वासुदेव सहस्त्रबुद्धे –ट्रस्टी- पुणे ५) श्री. माधव कृष्णा देशपांडे- ट्रस्टी- मुंबई ६) श्री. नागेश परशुराम चितळे- सदस्य एकतपुर ७)श्री. पुरुषोत्तम कानजी- ट्रस्टी- मुंबई या स्वातंत्र्यवीरांनी सदरची संस्था स्थापन केलेली होती.
सदरची संस्था ही राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सिद्धांतनुसार लोक कल्याणाच्या हितासाठी व राज्यातील लोकांची सेवा करणे, ग्रामसेवा, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे, ग्रामोद्दोगाचे कार्य व खेड्यातील जनतेची सेवा करणे व त्यांच्या कार्यास मदत करणे हे महाराष्ट्र सेवा संघाचे उद्देश असलेमुळे त्यावेळी महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच संस्थांमध्ये महाराष्ट्र सेवा संघाची गणना होत होती.
महाराष्ट्र सेवा संघामार्फत सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे खादी ग्रामद्दोग उत्पादन केंद्र हे प्रथम आटपाडी येथील कल्लेश्वर मंदिरा जवळील देशपांडे यांच्या वाड्यामध्ये सुरू करण्यात आलेले होते, त्यावेळी फक्त चरख्यावर सूत कताईचे काम सुरू करणेत आलेले होते.
आटपाडी येथे खादी ग्रामोद्दोग उत्पादनाच्या कामासाठी जागा मिळण्यासाठी औंधचे राजे पंत प्रतिनिधी यांचे कडे जमीन मागणी करिता आटपाडी येथील श्री. रावसाहेब (अण्णा) देशमुख, काजी मास्तर तसेच महाराष्ट्र सेवा संघाच्या वतीने श्री. विष्णू निळकंठ देशमुख (पुणे) हे औंध येथे गेलेले होते. परंतु औंध संस्थान हे भारतात विलीनकरण झालेमुळे जमीन मिळाली नाही, त्यामुळे आटपाडी येथील मान्यवर मंडळीच्या सूचनेनुसार आटपाडी येथील खाजगी मालकीची देशपांडे यांची जमीन सर्वे नंबर ७२८ मधील २ हेक्टर १५ आर इतकी इतकी जमीन ही महाराष्ट्र सेवा संघ पुणे यांनी आटपाडी खादी ग्रामोद्दोग भंडारा साठी खरेदी पत्राने विकत घेऊन सदर जमिनीवर खादी ग्रामघोग भंडार व कार्यालय सुरू करण्यात आलेले होते.
आटपाडी येथील खादी ग्रामोद्दोग भंडारमार्फत सदर जमिनीवर सात विभागांच्या इमारतीचे बांधकामे केलेली आहे, त्यामध्ये १) खादी ग्रामोद्दोग भंडाराचे कार्यालय २)वस्त्रागार ३) गोडाऊन ४) धुलाई केंद्र ५)रंगाई केंद्र ६) लाकडी तेल घाना ७)गेस्ट हाऊस त्याचबरोबर विहीर व पंप हाऊस असे विभागावर इमारती बांधल्या आहेत. सदर इमारतीचे बांधकाम आटपाडी येथील श्री. ज्ञानू रामा खरात(मुकादम- गवंडी) यांनी आटपाडी भागातील अनेक गवंडी व मजुरांना घेऊन घडीव दगडी बांधकाम केलेलेचा उत्कृष्ट व अप्रतिम बांधकामे झालेली आहेत. त्याचबरोबर कौठूळी येथील बबन सुतार यांनी इमारतीवर लाकडी काम सुबक व आकर्षकपणे केलेली आहेत. त्यामुळे सदरच्या इमारती आटपाडीच्या वैभवात भर घालतात.
आटपाडी खादी ग्रामोद्दोग भंडाराचे इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र सेवा संघामार्फत खादी ग्रामोद्दोग भंडार येथे खादीच्या कापडाच्या उत्पादनात सुरुवात करण्यात आली होती. शेतकऱ्यांकडून आलेल्या कापसातून सरकी बाहेर काढून त्या कापसाची व्यवस्थित पिंजाई करून त्यांचा पेळू तयार केला जात असत.
सदरचा पेळू हाताने तयार करून तो हात चरख्यावर कताई साठी दिला जात असत. त्यांची कताई झाल्यानंतर त्यापासून सूत काढण्यात येत असत व ते सूत हात मागावर विणणे साठी दिले जात असत. हातमागावर विणलेल्या त्या कपड्यापासून सुती कापड तयार करण्यात येत असत व त्यांचे तागे तयार करण्यात येत होते. त्या सुती कापडापासून सदरा, धोतर, लुगडी, लुंगी, रुमाल, बेडशीट इत्यादी वस्तू बनवण्यात येत असत. त्यानंतर सदर कपड्याची धुलाई, रंगाई व छपाई करून सदर कपड्याचे तागे बनवून ते तागेतील कापड हे आटपाडीच्या खादी ग्रामोद्दोग भंडारा मार्फत देशभर विक्रीसाठी पाठविण्यात येत असत.
सदर खादी कपड्याचे तागे हे चंदीगड,अंबाला, पानिपत, घरोंदा, भोपाळ, अहमदाबाद, कानपूर, मुंबई, नागपूर, पुणे, सांगली तसेच दक्षिण भारतात बेंगलोर, चेन्नई, मथुराई या ठिकाणी विक्रीसाठी पाठवले जात असत.
त्याचबरोबर खादी ग्रामोद्दोग विभागातून लाकडी घाण्यातून करडई, भुईमूग, सूर्यफूल व सरकी यापासून तेलाचे उत्पादन घेण्यात येऊन ते सुद्धा इतर राज्यात विक्रीसाठी पाठवण्यात येत असत. सदर तेल घाण्याचे काम हे कुंभारी कौलारू या इमारतीत करण्यात येत होते, त्यामुळे आटपाडी भागातील अनेकांच्या हाताला रोजगार मिळत होता.
आटपाडी खादी ग्रामोद्दोग भंडारातून निर्यात केलेल्या खादी कापडाच्या विक्रीपासून येणाऱ्या पैशातून परराज्यातून आयात केलेल्या लोकोपयोगी ग्राम उद्दोगी वस्तु, सामान हे तिथून विकत घेऊन येवून ते आटपाडीच्या खादी भंडारातील गोडाऊन मध्ये ठेवण्यात येऊन त्या वस्तू व सामानाची विक्री आटपाडीच्या खादी भंडार कार्यालयातून करण्यात येत असत. पर राज्यातून आणलेल्या वस्तूमध्ये खादी -शर्टींग, टॉवेल, रुमाल, लुंगी, बेडशीट, चादर, मच्छरदाणी, सतरंजी, रेशीम- मध्ये साडी व शर्टींग, उलन मध्ये- कंबल, शाल, घोंगडी, ग्रामोघोग मध्ये – पोली वस्त्र, मध, गुलकंद, जेली,काकवी, सरबते, हळद, मसाले, आमसूल, उदबत्ती, अत्तर, साबण, धूप तसेच चामड्यामध्ये- कानपुरी बूट, चप्पल, सॅंडल, लेडीज चप्पल या वस्तू व सामान हे आटपाडीच्या खादी भंडार या कार्यालयातून सदरच्या वस्तू व सामानाची प्रचंड मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. त्यावेळी आटपाडी खादी भंडार हे सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यात लोकोपयोगी सामानासाठी प्रसिद्ध झालेले ठिकाण होते.
त्यामुळे लोक आवडीने स्वदेशी वस्तू खरेदी करीत असत.
आटपाडीच्या खादी भंडारात अनेक चरखे व हातमाग चालत होते. पिंजाई करून चरख्यावर सूतगुंड्या बनविण्यासाठी अनेक महिला व पुरुषांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत होता. तसेच हातमागावर अनेकांना मुबलक काम मिळत होते. त्यामुळे ग्रामीण कारागीरांना हक्काचा व हमखास रोजगार मिळत असल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटत होता.
त्यावेळी आटपाडी खादी ग्रामोद्दोग भंडाराचे व्यवस्थापक म्हणून विष्णू निळकंठ देशमुख (पुणे) हे कामकाज पहात असत. त्यावेळी हिशोबनीस म्हणून काम करणारे आक्रुड कवडे, शंकरराव चांडवले, बापू कवडे, अंबादास देशमुख, श्रीराम वाघ, बापूराव विभुते हे कामकाज सांभाळीत होते. तसेच रंगाई, धुलाई, छपाई या विभागाचे काम करणारे अण्णा माळी ,सोपान अनुसे, कृष्णा विभुते, दत्ता माळी हे या विभागाचे कामकाज पहात होते. त्यामुळे आटपाडी भागातील अनेक लोकांना खादी ग्रामद्दोग भंडारात रोजगार मिळत असलेमुळे त्यांचे जीवनमान त्यावर अवलंबून होते.
आटपाडी खादी भंडारातून सूतगुंडी यांचे उत्पादन केलेल्या सूतगुंड्या या करगणी, दिघंची, तासगाव, लवूलगांव, माढा, करकंब, पंढरपूर, बेगमपूर, मंगळवेढा, मिरज या ठिकाणी सूतगुंड्या पाठविण्यात येत असत. सदर गावांमध्ये पाठविलेल्या सुत गुंड्या ह्या त्या गावचे कारागीर हातमागावर विणून खादी कपड्याचे तागे तयार करून ते पुन्हा आटपाडी खादी ग्रामोद्दोग भंडारात आणून विकत असत. त्यामुळे सदर गावच्या ग्रामीण कारागीरांना सुद्धा अनायासे हक्कांचा रोजगार मिळत असत.
त्या रोजगारातून मिळालेल्या पैशातून ते आपला कुटुंब कबिला चालवीत असत. त्यामुळे आटपाडी येथील खादी ग्रामोद्दोग भंडार हे रोजगाराचे व स्वदेशी वस्तू विक्रीचे प्रमुख ठिकाण झालेले होते.
महाराष्ट्र सेवा संघाचे, खादी कार्यालयाचे विक्री भंडार हे सांगली, पुणे, मोहोळ, पंढरपूर, अकलूज, करकंब, रत्नागिरी ,शिरूर, घोडनदी, कुंडल या ठिकाणी स्थापन केलेले होते. सदर ठिकाणी आटपाडी खादी भंडारातून पाठविलेले खादी कापडाचे तागे व इतर सामानाची भरपूर प्रमाणात विक्री त्या ठिकाणी होत होती. आटपाडीच्या खादी भंडाराची वार्षिक उलाढाल साधारण एक कोटीपर्यंत होत होती.
त्यामध्ये २५ लाखाचे उत्पादन व ७५ लाखांची विक्री साधारणपणे होत असत. त्यामुळे खादीचा प्रचार व प्रसार होऊन अनेक लोक खादी कपड्याचा वापर करीत असत. खादीचे कापड अंगावर असणे हे सभ्यतेचे लक्षण समजण्यात येत असत.
महाराष्ट्र सेवा संघाचे आटपाडी येथील खादी ग्रामोउद्दोग भंडार हे खादी व ग्रामोद्दोगांना उत्तेजन व रोजगार देण्यासाठी ना नफा – ना तोटा या उद्देशाने स्थापन केलेले होते. ग्रामीण भागात अर्थचक्र फिरले पाहिजे, देशी वस्तूला बाजार मिळवून देणे व खेडेगावातील लोकांना हक्काचा रोजगार देणे, ग्रामीण उद्योगांच्या उत्पादनात सुधारणा करणे व खेडेगावातील रोजगारांना प्राधान्य देणे याबाबत सदरचे महाराष्ट्र सेवा संघामार्फत आटपाडीचे खादी ग्रामोद्दोग भंडार हे कार्यरत होते.
सध्या आटपाडी येथील खादी भंडारात विनाई, हातमाग विभाग सुरू असून त्यांचे विक्री केंद्र सुरू आहे. बाकीचे विभाग बंद आहेत. त्यामुळे शासनाने व जनतेने सहानभूतीपूर्वक आटपाडी गावचे वैभव असणारे खादी भंडार हे डबघाईला येऊ न देता ग्रामीण भागातील कारागीरांना हक्काचा रोजगार देणाऱ्या खादी ग्रामोद्दोग भंडारास सहकार्य व सहानुभूतीची भूमिका घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सहकार्य- श्री दिलीप लाटणे
आयु. विलास खरात,
लेखक आटपाडी जि. सांगली.