आटपाडी प्रतिनिधी :- सुधीर पाटील ..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
आटपाडी : पुणे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारा यां वर्षीचा “यशस्विनी सन्मान पुरस्कार”
शनिवार दि. २२ जून रोजी स.११ ते १ दरम्यान पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून आदरणीय शरदचंद्र पवार आणि पद्मश्री अनु आगा यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
राज्यातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता, क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा महिलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या महिला धोरणाला २२ जून २०२४ रोजी ३० वर्षे पूर्ण होत आहेत.
या प्रसंगाचे औचित्य साधून कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे तसेच ह्या सोहळ्यामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर व सकाळ प्रकाशनतर्फे गेल्या ३० वर्षात महिला धोरणावर झालेल्या प्रगतीविषयी आढावा घेणारे पुस्तक मा. प्रगती बाणखेले आणि मा.संध्या नरे-पवार यांनी संपादित केले आहे त्याचे प्रकाशन आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते होईल.
महाराष्ट्रातील २० मान्यवरांचे लेख ह्या पुस्तकात आहे आणि सदर पुस्तकाची कल्पना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष मा.सुप्रिया ताई सुळे यांची आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष मा.सुप्रिया सुळे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. स्त्रीकेंद्री आत्मभान जपत मराठी कवितालेखनाला अनुभव व अभिव्यक्तीचे एक नवे परिमाण उपलब्ध करून देणाऱ्या ‘ललददास्य ललबाय’ या कविता संग्रहाच्या लेखिका मीनाक्षी पाटील (मुंबई) यांना ‘यशस्विनी साहित्य सन्मान’, स्वावलंबी शेतकरी महिला संघटना चालवणाऱ्या पर्यावरणस्नेही कलावती सवंडकर(हिंगोली) यांना ‘यशस्विनी कृषी सन्मान’, एकल स्त्रियांना सक्षमीकरणाकडे समर्थपणे घेऊन जाणाऱ्या तसेच हजारो स्त्रियांच्या शोषणाचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदलाची पहाट आणणाऱ्या रुक्मिणी नागापुरे (बीड) यांना ‘यशस्विनी सामाजिक सन्मान’, विविध माध्यमातून आपली पत्रकारितेची छाप समाजमनावर उमटवणाऱ्या संध्या नरे पवार (मुंबई) यांना ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान’, आपल्या उद्योगाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या राजश्री गागरे (भोसरी-पुणे) यांना ‘यशस्विनी उद्योजकता सन्मान’, शूटिंग एंड राइफल ट्रेनिंग क्षेत्रामधील निष्णात महिला प्रशिक्षक श्रद्धा नलमवार (नाशिक) यांना ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून या सहाही क्षेत्रात अत्यंत तळमळीने काम करत योगदान देणाऱ्या या प्रतिथयश महिलांना पुरस्कार देताना आम्हाला आनंद होत आहे. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.