आटपाडी चा सरदार – मारुती लांडगे ”
लेखक,आयु.विलास खरात
प्रतिनिधी: सुधीर पाटील…
आटपाडी
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
आटपाडी :स्वातंत्र्यपूर्व काळात मातंग समाजाची गणना ‘अस्पृश्य’ या जाती समूहात होत होती. मातंग समाज हा धाडसी व कलागुण संपन्न असलेमुळे तो दांडपट्टा, लाठी- काठी चालवणे, लेझीम, हालगी, तमाशा व भजनी मंडळात अग्रेसर होता. अशा या आटपाडी भागातील मातंग समाजाची थोडक्यात माहिती पाहूया. औंध संस्थानातील आटपाडी या गावी मातंग समाज हा साधारण सन १८७० ते १८९० च्या दरम्यान आलेचे सांगितले जाते. आटपाडी येथील मातंग समाजाचे मूळ गाव हे पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरुनगर) असलेचे बोलले जाते. खेड येथून मातंग समाजाचे लोक हे पोट भरण्यासाठी भटकंती करीत, बारामती या गावी आले होते. तेथून ते आटपाडी या गावी येऊन पूर्वश्रमीच्या महार समाजाच्या वस्ती जवळील मोकळ्या जागेत दहा-बारा घराची वस्ती टाकून राहू लागलेले होते. त्यातील दोन घरे ही करगणी गावी जाऊन स्थायिक झालेले आहेत. सदरचे मातंग समाजातील लोक हे शेतकऱ्यांसाठी लागणारे दोरखंड, कासरे, नाडे, मुस्के, केरसुण्या, शिंके इत्यादी वस्तू तयार करून ते शेतकऱ्यांना बलुत्याच्या मोबदल्यात देत असत व येणाऱ्या धान्यातून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवीत असत. त्याकाळी मातंग समाजाची घरे ही मातीच्या भेंड्यापासून चार फूट उंचीच्या भिंती बनवून त्या झोपडीच्या छपरावर उभे -आडवे लाकडी वासे टाकून कंजाळ, शेवरी, करंजाच्या फांद्या टाकून छप्पर शेकरून घेत असत व त्या झोपडीच्या घरामध्ये कुटुंबासह जीवन जगत असत.
अशा आटपाडी गावातील मातंग समाजातील साधू नाथा लांडगे व कृष्णाबाई यांच्या पोटी मारुती यांचा जन्म साधारण ०२ फेब्रुवारी १९२१ च्या दरम्यान आटपाडी येथे झालेला आहे. मारुती यांचे बालपण अत्यंत गरीब परिस्थितीत गेले. घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य, त्यात शिक्षणाचा अभाव अशा परिस्थितीत आई-वडिलांच्या बरोबर, शेतकऱ्यांच्या रानातील किंवा ओढ्याच्या बाजूला असणाऱ्या कैकताड किंवा घायपात आणून त्यापासून चऱ्हाटे तयार करून, आटपाडीच्या ओढ्यातील पाण्याच्या डबक्यात किंवा कैकाडी डोहातील पाण्यात भिजू घालत असत व त्यापासून कासरे, नाडे, मुसके, शिंकी इत्यादी वस्तू तयार करून ते शेतकऱ्यांना देत असत व येणाऱ्या धान्यातून कुटुंबाची गुजरान करीत असत. सदरच्या वस्तू बनवण्यासाठी मारुती हा आपल्या आई- वडिलांना मदत करीत असत. मारुती हा लहानपणापासूनच हुन्नरी व कलागुण संपन्न असलेमुळे तरुणपणात त्यांच्या ओठावर गाणी येऊ लागलेली होती. त्याकाळी पूर्वश्रमीच्या महार समाजाच्या “तक्या” मध्ये (समाज मंदिर) रायरंदाचे व तमाशाचे मनोरंजनाचे खेळ चालत असत. ते पाहण्यासाठी मारुती हे आवर्जून उपस्थित राहून भाग घेत असत. त्यामुळे मारुती यांच्या मनात तमाशात काम करण्याची उर्मी जाणवू लागली होती. तेथूनच तमाशाचा नाद त्यांच्या डोक्यात घोळू लागलेला होता.
मातंग समाजाच्या वस्ती जवळूनच पाणी जाण्यासाठी “खवण” (नाला) असलेमुळे दर पावसाळ्यातील पाण्यामुळे मातंग समाजाच्या वस्तीची पाण्यामुळे तारांबळ व दुर्दशा होत असत. पावसाच्या पाण्यामुळे वस्तीचे नुकसान हे ठरलेले असायचेच. साधारण सन १९३१-३२ साली आटपाडी येथील शुक्र ओढ्यास पावसाळ्यात मोठा पूर आलेला होता. त्यामुळे खवणीत (नाला) पाण्याचा फुगवटा झालेमुळे पाणी हे पूर्णपणे मातंग समाजाच्या वस्तीत घुसलेमुळे घरा-दाराचे अतोनात नुकसान झाले होते. पुराच्या पाण्यामुळे घरा-दारातील सर्व जीवनावश्यक वस्तू, सामान पुराच्या पाण्यात वाहून गेलेमुळे वस्तीतील लोकांना अंगावरच्या वस्त्रानिशी त्यांनी संपूर्ण रात्र आटपाडीच्या तक्यात (समाज मंदिर) काढलेली होती. त्यामुळे गावच्या कारभाऱ्यांनी व पाटील, कुलकर्णी यांच्या सहमतीने आटपाडी येथील गावठाणा बाहेरील माळरानातील सर्वे नंबर १३९१ मधील जमीन निवासी कारणासाठी सन १९३४ साली मातंग समाज्यास देण्यात आलेली आहे. त्यामुळे मातंग समाजाची घरे ही सदर जागेत निवासाठी व राहण्यासाठी आलेली आहेत. सध्या सदर वस्तीस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर या नावाने ओळखले जाते.
मारुती साधू लांडगे यांनी मातंग समाजाचा पूर्वंमपार चालत असलेल्या व्यवसायाला झुगारून जातीयतेचा कटू अनुभव पाठीशी घेऊन समाज व्यवस्थेने अस्पृश्य ठरविलेल्या समाजाला आत्म भानातून बाहेर काढून अस्पृश्यतेचे चटके सोसलेल्या लोकांना सोबत घेऊन मनोरंजनातून प्रबोधन करण्यासाठी त्यांनी तमाशाचा मार्ग निवडलेला होता, त्यामुळे ते सांगोला तालुक्यातील नाझरे गावचे प्रसिद्ध तमासगीर संभू व गोपाळ या दोन भावाच्या तमाशा मंडळात काम करण्याचा निर्णय घेतलेला होता.
साधारण सन १९५९- ६० साली संभू व गोपाळा(नाझरे) यांच्या तमाशा मंडळात मारुती साधू लांडगे हे तमासगीरांचे काम करू लागलेले होते. त्यावेळी मारुती यांचे मामा सखाराम वाघमारे हे नाझरे गावचेच असलेमुळे त्यांना वाटत होते की मारुती याने तमाशात काम करू नये, घर प्रपंचा करावा, तमाशाचा नाद बरोबर नाही असे त्यांचे मत होते. परंतु मारुती हे मामाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत असत. त्यामुळे मारुती हे तमाशा कामासाठी नाझरे येथे आलेनंतर सखाराम वाघमारे हे चाबकाने मारुती यांना मारत असत व नाझरे येथील खंडोबाच्या मंदिरापासून गावात येऊ देत नसत परंतु मारुती यांना तमाशाचा प्रचंड नाद असलेमुळे ते अनेक क्लुप्त्या काढून तमाशात काम करीत होते.
शंभू व गोपाळा यांच्या तमाशात मारुती हे वग नाट्यात सरदाराचे काम अप्रतिम करीत असत. तमाशातील वगनाट्यातील सरदार हे पात्र रंगमंचावर हुबेहूब सादर करीत असलेमुळे रसिक प्रेक्षकांना “सरदार” हे पात्र आवडू लागलेले होते. मारुती हे सरदाराचे पात्र सादर करताना ते सरदाराचा जोश, लकब, संवाद फेक असा अभिनय अफलातून करीत असत. त्यामुळे रसिक प्रेक्षक हे टाळ्या वाजवून दिल खुलास पसंती देत असत. त्यामुळे तमाशा कलावंत व शंभू गोपाळा यांनी मारुती यांना सरदार ही पदवी दिलेली आहे. त्यामुळे जनमानसात मारुती यांना सरदार या नावानेच संबोधित असत. मारुती हे शंभू व गोपाळा यांना गुरुस्थानी मानत असत.
सरदार मारुती लांडगे हे अनेक दिवस तमाशात काम करीत असलेमुळे त्यांना गावोगाव चा अनुभव आलेला असलेमुळे त्यांनी स्वतःचा तमाशाचा फड उभा करायचा अशी मनोमन जिद्द बांधली व तमाशासाठी कलावंताची जुळवा जुळं करू लागलेले होते.
साधारण सन १९६४-६५ साली मारुती लांडगे यांनी आटपाडी या गावी “सरदार लोकनाट्य तमाशा मंडळ आटपाडी” या नावाने त्यांनी नवीन तमाशाचा फड उभा केलेला होता. सदर तमाशा मंडळाच्या वतीने आटपाडी येथील बाजार पटांगणात व सोनारसिद्ध मंदिराजवळील मैदानात तमाशाचे उद्घाटनाचे दोन प्रयोग करणेत आलेले होते. त्यांनी तमाशा मंडळाची बांधणी व्यवस्थित केलेली होती व त्यावेळी गण-गौळण,बतावणी , नाच गाणी, सोंगाड्या,मावशी, वगनाट्य, भैरवी यासाठी तमाशा कलावंतांचा संच त्यांनी उभा केलेला होता. सुरुवातीस नाच गाण्यावेळी पुरुष मंडळींना महिलांचा वेश परिधान करून नाचवण्यात येत असत. तमाशाच्या तालमीसाठी स्वतःच्या झोपडीवजा घरात सराव करीत असत. मारुती लांडगे सरदार यांची शरीर यष्टी साधारण होती. त्यांची उंची साडेपाच फुटापर्यंत होती. रंग गोरा, नजर भेदक, अंगात काळा कोट, डोक्याला कोसा पटका, काझीचा सदरा, काठाचे पातळ धोतर, पायात कोल्हापुरी चप्पल अशा रुबाबदार पेहेरावात राहत व वागत असत.
आटपाडी येथील कार्तिक यात्रेवेळी माळ रानावर कापडी कनात व स्टेज उभे करून गॅस बत्तीच्या उजेडात रात्रीच्या वेळी “सरदार लोकनाट्य तमाशा मंडळ” आटपाडीच्या वतीने “रक्तात रंगली अब्रू” या वगनाट्याचा प्रयोग ठेवण्यात आलेला होता. मान्यवर मंडळींच्या हस्ते नारळ फोडून तमाशाचा खेळ सुरू करण्यात आला होता. सर्व तमासगीर मंडळी स्टेजवर एकत्र येऊन स्तवन गीत म्हणून (नांदी) सुरुवात करण्यात आली. त्यानंतर तमाशाच्या स्टेजवरती हालगीचा शेडा नामा (मास्तर) लांडगे व ढोलकीचा तोडा शिरडोणकर ढोलकी पट्टू या दोघांनी अप्रतिम वाद्य वाजवून सादरीकरण केले. नंतर सरदार मारुती लांडगे व नामा (मास्तर) लांडगे यांनी गण सुरू केली. त्यास रिंगाटीची साथ नामदेव गोपाल लांडगे व भाऊ दादू लांडगे यांनी दिलेली होती. त्यानंतर गण-गौळणीचे सादरीकरण झाले व बतावणीचा कार्यक्रम हा सामाजिक व्यवस्थेवर विनोदी स्वरूपात सादर करण्यात आला. त्यानंतर तमाशातील मुख्य वग नाट्यास सुरवात करीत असत “रक्तात रंगले आब्रू” हे वग नाट्य आटपाडीतील तमाशा कलावंतांनी अप्रतिमपणे सादरीकरण केले होते. सदरच्या वग नाट्यात मुख्य भूमिका सरदार मारुती साधू लांडगे, भाऊ दादू लांडगे, नामा तुका लांडगे, नामा गोपा लांडगे, मारुती कांबळे, बबन लांडगे, हिराबाई, लताबाई, अंजुबाई इत्यादी मंडळींनी वग नाट्यात काम केलेले आहे. त्यानंतर भैरवी गीताने तमाशाची सांगता होऊन कार्यक्रम संपत असत.
सरदार लोकनाट्य तमाशा मंडळ आटपाडी या नावाने तमाशाचा फड उभा करून सरदार यांनी आपले स्वप्न पूर्ण केले होते. गरीब परिस्थितीत ज्या धाडसाने व जिद्दीने तमाशाचा फड (संच) उभा करून तमाशाची कला अंगी जोपासून मातंग बांधवांना सोबत घेऊन तमाशाचा फड उभा करून इतिहास निर्माण केला होता. सरदार यांनी कर्ज काढून पायपेटी, ढोलकी, हलगी, तुन-तुने, टाळ, झांझरी, घुंगरू इत्यादी सामान घेऊन तमाशाचा प्रवास सुरू केलेला होता. सरदार यांचे तमाशाचे खेळ हे आटपाडी, सोनारसिद्धनगर, निंबवडे, विटा, नागज, नाझरे, चेंबूर(मुंबई) येथे तमाशाच्या खेळाचे सादरीकरण केलेले आहे. तमाशाचा खेळ पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक हे गर्दीने येत असत. त्यावेळी तमाशामध्ये हिराबाई नागजकर, लताबाई नाझरेकर, अंजुबाई हेगडे या नृत्य कलेचे काम करीत असत. तमाशाचे तिकीट बुकिंग मास्तर म्हणून बबन लांडगे व प्रल्हाद लांडगे हे करीत असत. बाहेरगावी तमाशाचे खेळ असतील, त्यावेळी शेतकरी आपली बैलगाडी प्रवासासाठी मोफत देत असत. बैलगाडी नसेल तर तमाशा कलावंत आपल्या डोक्यावर सामान घेऊन जात असत. “सरदार लोकनाट्य तमाशा मंडळ आटपाडी” यांनी अनेक गावात खालीलप्रमाणे वगनाट्य सादर केलेली आहेत. १) रक्तात रंगली अब्रू २) राजा हरिश्चंद्र तारामती ३) पाटलांचा पोर ४) सावळ्या मांग या वगनाट्याचे प्रयोग सादर करीत असत. सदरचे खेळ हे रात्रीच्या वेळी गॅस बत्तीच्या उजेडात करीत असत. तमाशाचे खेळ झालेनंतर वीस ते पंचवीस तमाशा कलावंतांना स्वयंपाक करून जेवण घालण्याचे काम सरदार मारुती यांच्या पत्नी नानुबाई ह्या प्रामाणिकपणे करीत असत.
सरदार मारुती लांडगे यांनी तमाशा फड उभारणी कामी जे कर्ज घेतलेले होते. ते कर्ज वेळेवर फेडता आले नाही. ते कर्जबाजारी झाले. त्यांना आर्थिक अडचणी निर्माण झालेमुळे तमाशाचे खेळ बंद पडले होते. कर्ज फेडणीसाठी पायपेटी व ढोलकी गहाण ठेवलेली होती. सरदार मारुती यांनी आर्थिक तंगीमुळे तमाशाचा फड कायमस्वरूपी बंद करून ते भक्तिमार्गाला लागले होते. पंढरपूरची वारी नियमित करून लागले, त्यांनी भजनी मंडळ स्थापन केले, पंढरपूर येथील संत गाडगे महाराज यांचे शिष्य शिवलिंग महाराज यांचे मठात जात असत. सन १९७२ साली आटपाडी ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते निवडून आलेले होते.
आटपाडी भागात महाराष्ट्रातील नामवंत तमाशा सम्राट यांचे आगमन होत असत. त्यामध्ये विठाबाई भाऊनारायण गांवकर, शंकर खुडे नारायणगांवकर, काळू बाळू तमाशा मंडळ, मंगला बनसोडे, मालती इनामदार, गणपत व्ही. माने चिंचणीकर यांचे तमाशा मंडळ आले नंतर सरदार मारुती लांडगे यांना स्टेजवर बोलावून मान-सन्मान देऊन त्यांचा सत्कार करीत असत व त्यांना विनंती करीत असत की सातव्या व नव्या पटीत गण सादर करण्याचा मान देत असत, त्यावेळी सरदार हे पहाडी आवाजात गण सादर करीत असत.
अशा या आटपाडी येथील महान तमाशा कलावंत “सरदार मारुती लांडगे” यांनी आटपाडी व परिसरातील गाव खेड्यात इतिहास निर्माण केला अशा या महान कलावंताचे निधन हे शनिवार दिनांक ३ जानेवारी १९९३ रोजी आटपाडी येथील राहत्या घरी झाली आहे.त्यांना विनम्र अभिवादन !
आयु.विलास खरात
लेखक-आटपाडी जि.सांगली