महा आवाज News

माणदेश मधील सत्य घटने वर आधारित लेख,

शेषाप्पा!
सुधीर पाटील 
आटपाडी 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
आयु,विलास खरात:लेखक,
आटपाडी :पहाट झाली प्रकाश उजळत सर्व दिशामध्ये पसरत चालला होता. वातावरण शांत, अल्हादायक होते, चिमणी पाखरे घरट्यातून बाहेर पडून दाण्यागोट्यासाठी रानावनात फिरत असता त्यांची किलबील सुरु झाली. शेतकरी शेतात जाऊ लागले. बायामाणस ओढ्यातील झऱ्यातील पाणी खपराच्या घागरीतून आणू लागले काहीजन ओढ्यामध्ये वाहत्या पाण्यात आंगोळ करीत होती. म्हैशीची दुध काढणेची सुरुवात केली होती. गाव गाड्यातील पहाटेची कामे सुरु झालेली होती.
शेषाप्पा महार पहाटे लवकरच दामू आण्णाच्या शेतात येऊन बांध व सरी घालणेचे काम सुरु केले होते. काम लगबगीने करीत होता. काम लवकर संपवून घरी जायचे होते. त्यामुळे कामाचा झपाटा लावला होता. येताळाने रात्रीच सांगितले होते. मटणाचा वाटा घेऊन जाणेसाठी पाटी घेऊन ये हे शब्द शेषाप्पाच्या डोक्यात काम करताना घुमत होते. त्यामुळे बांध व सरी व्यवस्थित घालून झाल्यावर. पाटाच्या पाण्यात हात पाय धोवून लगबगीने खोरे व पाटी घेऊन गावच्या ओढ्याकडे चालला होता.
गावच्या ओढ्यामध्ये भावकीची मंडळी प्रत्येकाचा मटणाचा वाटा मांडत होती. सर्वांनी आपआपले मटणाचे वाटे लोखंडी पाटीत, घेतले त्या वेळी शेषाप्पा म्हणाला- दामूआण्णाच्या शेतात सारा व बांध घालायचा होता. ते काम करुन लगोलग आलोय बघा उशीर झाला माफी असावी सर्वजनानी एकमेकांच्या तोंडाकडं बघुन मटण पाटीत घालून आप-आपल्या घरी आली.
भावकीत कडक नियम ठेवलेले होते. त्यावर समाज्यातील कारभारी मंडळीचा बारकाईने लक्ष असायचे भावकीत वाट्याचे उनेकरी कोणाला होऊ दिले जात नसत. एकमेकांला सांभाळून घेत असत. कोणत्याही कामात हाताला हात देऊन काम करीत असत. मुद्दाम कुणाच्या पायात पाय घालत नसत. समाज्याची महाराची वस्ती मोठी होती. गुण्या गोविंदाने रहात होती. समाज्यात हेवेदावे भांडण तंटा होत नसत कारभारी म्हणून, पांडा, धोंडी, येताळा, शेषाप्पा, सखाराम ही मंडळी त्यावर तोडगा काढून प्रश्न निकाली काढत असत. समाजाच्या एकजुटीमुळे गाव थोडस बिचकून असायचे.
शेषाप्पा महार हा काळ्या सावळ्या रंगाचा होता. शरीराने पिळदार व मजबूत होता. भेदक करारी नजर होती. नाक सरळ होते. साधा सरळ स्वभावाचा होता. तरुण पणात पैलवानकी केली होती. संस्थानात अनेक कुस्त्यांचे फड गाजविले होते. वडील अचानक वारलेमुळे रघु चुलत्याने म्हसवड येथील पाहुण्याची मुलगी पाहून शेषाप्पाचे लग्न उरकुन घेतलेले होते. शेषाप्पाला एक मोठी बहीण व भाऊ होता. बहिणीचे लग्न झाले होते. ती मुंबई येथे रहात होती. भावाचे नाव शंभू होते. शेषाप्पाच्या बायकोचे नाव साजुका होते. त्यांना महादू नावाचा एक लहान मुलगा होता. शेषाप्पा लहान असतानाच त्यांची आई कोंडाबाई वारली होती. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी शेषाप्पावर येऊन पडली होती. बायको, मुलगा, भावाची जबाबदारी पार पाडत होता. म्हारकीत थोडी बहुत जमिन होती. दोन खणी छप्पर झोपडीचे घर होते घरात लोखंडी पेटी चार भांडी, खापराच्या घागरी, रांजन, वाकळा इत्यादी सामान होते. एक शेळी व चार कोंबड्या पाळल्या होत्या.
शेषाप्पा लोखंडी पाटीत मटणाचा वाटा घेऊन घरी आला. पोरग पळत येऊन पायाला बिलगल कुत्र जवळ येऊन पायाजवळ घुटमळु लागले. अगं साजुका काय करतीया बाहेर ये. त्यावेळी साजुकाचे झोपडीच्या आतील जमिनीचे शेणाने सारवणे सुरु होते. आवाज आला. तरी शेणाचा गोळा करंज्याच्या पाटीत टाकून हात धोऊन बाहेर आली व म्हणाली काय व काय झालं? त्यावर डोक्यावरील लोखंडी पाटी खाली ठेवत म्हणाला. अग आज मटणाचा घाटा आणला आहे तू हातपाय धु आणि मटणाचे जेवण लवकर कर असे. म्हणून पाटी तीच्या ताब्यात देऊन महादूला घेऊन शुक्र ओढ्यावर आंघोळीसाठी गेला.
ओढ्यातील वाहत्या पाण्यात मनसोक्त दोघांनी अंगोळी करुन घराकडे येत असताना देवळाच्या पारावर अधिकराव गप्पा मारत बसलेले होते. त्यांना समोरुन शेषाप्पा दिसल्यावर हाक मारुन बोलावून घेतले व म्हणाले शेतात सारा ओढायचे आहे. पाण्यासाठी दंड करुन झालेवर, ताल फुटली आहे. ती भरुन घ्यायची आहे. तेवढं काम कर, पायलीभर दाणं देतो. त्यावर शेषाप्पा म्हणाली की, व्हय बा करतुकी पण आज जमणार नाही. दामू आण्णाचा थोडा बांध राहिलेला आहे. तेवढ झाल का, तुमच्याच कामाला हात घालतू त्यावर अधिकराव ठिक आहे म्हणाले काम करणे अगोदर वाड्यावर ये असे म्हणून गप्पा मारु लागले. त्यावर शेषाप्पाने सर्वानाच हात जोडून नमस्कार घातला व म्हादूला घेऊन घरी आला.
2 Page
: साजूकाने झोपडीबाहेर वाकळ टाकली तांब्याभरुन पाणी दिले पाणी पिल्यावर शेषाप्पा साजूकाला म्हणाला. संभू कुठे दिसत नाही कुठे गेला आहे. त्यावर ती म्हणाली घरात पीठ नाही, दाणं नाहीत. ते आणण्यासाठी वाडीला तुमच्या मावस बहिणीकडे गेल्यात येतील आता? मटणाचा सुगावा लागला होता. त्यामुळे ते गेलेत. बर ठिक आहे. तुझा स्वयंपाक होऊस्तर मी तक्यात लवडंतो. शंभूला सांगून मला उठव. त्यावर ती होय म्हणाली.
साजुका कालवण बनविण्यासाठी चुलीकडे गेली. ताब्यांचा जुन्या हंड्यामध्ये मटण चुलीवर ठेवले. हिरव्या मिरच्या कुठून त्या कालवणात घातल्या, झोपडीत चान्या वाळत घातलेल्या त्या हंड्यात टाकल्या. त्यामुळे तेलाचा तरंग आला मटण शिजु लागले. शंभू रिकाम्या हाताने परत आला साजूकाने ते पाहिले काय बोलली नाही. शंभू म्हणाला वहिनी रकमाकडे सुध्दा दाणे नाहीत. रोज माडगच करुन खातात, पाव्हण राहवा म्हणत होते. पण मीच म्हटल दादा मला खवळील म्हणून आलो. परत त्यावर साजूका म्हणाली. तुमचा दादा तक्यात झोपलेत त्यांना बोलावून आणा येताना महादूला पण आवाज द्या. नंतर शेषाप्पा, शंभू, साजूका, म्हादू जेवायला बसले. नुसत्या मटण रस्स्यावर त्यांचे पोट भरले समाधानाने ढेकर देऊन पुढील कामास लागले.
शेषाप्पा सकाळी लवकर उठला अंगोळ करुन अधिकरावच्या वाड्या पुढे जाऊन म्हणाला. घरात आहे का? कोण? असे म्हणून दरवाज्याच्या बाजुला उभा राहिला. दरवाजा उघडणेची वाट बघु लागला. थोड्या वेळाने दरवाजा उघडला. अधिकराव बाहेर आले म्हणाले. काय र ऐवढ्या सकाळी व्हय जी आज तुमच्या शेतात लवकरच कामाला जातुया तेवढ सांगायला आलो हाय. अधिकराव म्हणाले, बरं ठिक आहे. ते सोप्यातील दातूळ खोरे, पाटी सोबत घेऊन जा, दातळाने सारे नीट ओढ व खोऱ्याने बांधावर नीट माती लाव, बाकी मंदिराच्या बाजूची ताल फुटली आहे. ती भरुन घे, असे म्हणून अधिकरावाने वाड्याचा दरवाजा बंद करु लागला, त्यावेळी शेषाप्पा म्हणाला. मालक घरात दान नाहीत. शेतातल काम झाल्यावर दान द्या आणि घरात शिळ्या भाकरी असतील तर द्या शेतात जाऊन खातो व काम सुरु करतो. त्यावर त्यांनी आवाज दिला घरात शिळ्या भाकरी असेल. तर फडक्यात बांधून आणा त्यावर फडक्यात भाकरी बांधून आणल्या.
त्या भाकरी, दातुळ, खोऱ्या व पाटी घेऊन शेषाप्पा अधिकरावच्या शेताकडे चालू लागला. शेतात गेल्यावर झाडाखाली बसून फडके सोडले तर दिडच भाकर होती. त्यातील अर्धीच भाकर खाऊन एक भाकर फडक्यात बांधली व झाडाच्या खोबणीत ठेवली. कारण
3 Page
: साजूका, शंभू, महादूसाठी एक भाकर राखून ठेवली होती. पाटातील पोटभर पाणी पिऊन शेषाप्पाने अर्ध्या भाकरीवर दिवसभर बांध, सारे, फुटलेली ताल भरुन घेतली. दिवस कधी मावळला त्याला कळलेच नाही. सगळे काम झालेवर दातुळ, खोरे रिकामी पाटी घेऊन अधिकरावच्या वाड्यावर येऊन आवाज दिला ते घरी नव्हते. बाहेर गेले होते. सामान ठेऊन शेषाप्पा एका भाकरीचे फडके घेऊन घरी परत आला, फडक्यातील भाकर साजूकाच्या हातावर ठेऊन म्हणाला तुम्ही तिघे मिळून खावा मी भाकर खाली आहे. उद्या सकाळी दाने आले का भाकरी खाऊया. त्यावर तिघांनी भाकर खाऊन पाणी पिऊन झोपी गेले.
शेषाप्पाच्या पोटात अन्नाचा घास नसलेमुळे झोप येईना कामाने अंग दुःखायला लागले होते. पायलीभर ज्वारीसाठी सकाळपासून संध्याकाळ पर्यंत घाम गाळला होता. अधिकराव उद्या नक्कीच दाने देईल या आशेवर काडाच्या झोपडीतून आकाशातील लखलखणाऱ्या रात्रीच्या चांदण्याकडे बघत वाकळेवर पडलेला होता. शंभू तक्यात झोपायला गेला होता. महादू साजूकाला कवटाळून झोपला होता. बाहेर कुत्री जोराने भुंकत होती. रात किड्याचा आवाज वाढला होता. पांडुरंगाचे नाव घेऊन शेषाप्पा झोपण्याचा प्रयत्न करीत होता. त्या विचारात कधी डोळा लागला कळलेच नाही.
सकाळी साजूकाने शेषाप्पास उठविले लवकर जावा दान घेऊन या नाहीतर मालक कुठेतरी जात्याल पंचाईत होईल शेषाप्पाने चुळ भरली तोंडावरुन पाणी फिरवले अंगात फाटका सदरा फाटक धोतर घालून वाड्याकडे जाऊ लागला. त्यावेळी साजूका म्हणाली अव दान आणायला धडप्पा तरी घेऊन जावा रिकाम्या हाताने कसे जाता. येताना काय बी करा दान घेऊन या बरेच दिवस भाकर बघायला मिळाली नाही. त्यावर शेषाप्पाचे मन भरुन आले. डोळ्यात आश्रू आलेले. तसेच थांबविले साजूकाकडे न बघता घडण्या घेऊन वाड्यावर गेला व मालक म्हणून हाका मारु लागला. अधिकराव वाड्याच्या दरवाज्याची कडी काढून बाहेर आला. दरवाजाचा आवाज ऐकूण शेषाप्पा सावध झाला. जुन्या दरवाजाचा करकर आवाज वाजू लागल्यावर उठून उभा रहात असताना अधिकराव म्हणाले, आर बर झाल तू आलास म्हैस रात्रीपासून काही खात पित नाही. बघ जरा तेवढ त्यावर व्हय जी म्हणून म्हैशीच्या पाठीवरुन हात फिरवला तोंड उघडून बघितले आणि म्हणाला मालक पांडु माळ्याला दाखवा तोच काय तो इलाज करील. त्यावर अधिकराव म्हणाले, पांडु माळ्याकडे म्हैस घेऊन जा, दाखवून म्हैस काय खात नाही. काय तो इलाज कर म्हणाव, माझी म्हैस आहे, म्हणून सांग. त्यावर शेषाप्पा काहीही न बोलता म्हैशीला घेऊन पांडूच्या घरी गेला. त्याला म्हैस दाखविली त्याने मागे पुढे फिरुन दात बघून
4 Page
 झाडपाल्याचे औषध दिले ते घेऊन म्हैस वाड्यात आणून बांधली, झाडपाल्याचे औषध पाण्यातून द्या असे सांगितलेने, ती औषधाची पुडी अधिकरावच्या हाती देऊन म्हणाला. मालक घरात दान नाहीत, पायलीभर दान तेवढ घाला. त्यावर अधिकराव म्हणाले, घरची मालकीन देवदर्शनाला गेलेली आहे. उद्या ये बघु असे म्हणून वाड्याचा दरवाजा बंद केला. शेषाप्पाने हातातील घडपा व वाड्याच्या दरवाजाकडे पाहत घरचा रस्ता धरला.
अधिकराव गावातील बडे प्रशस्थ असून करारी स्वभावाचे असलेमुळे कुणाला जुमानत नसत. त्यामुळे गावातील कोणी त्यांच्या जास्त नादी लागत नसत. रानातील बांधावरील झाड तोडल्यामुळे त्यांने एकाचा पाय तोडला होता. त्यामुळे जास्त करुन तो शेताकडे जात नसत. पे पाहुणे गबरगंड असलेमुळे लोक बिचकून असत.
साजूका झोपडीतील जागेची केरसुनीने साफ सफाई करीत असताना. शेषाप्पा येऊन मेंढीजवळ बसला. हातातला धडप्पा महादूकडे दिला. त्यावर साजुका काय समजायची ती समजली. नवऱ्याला म्हणाली अव काय काळजी करु नका, शेजारच्या तानु आत्याकडून हुलग आणून त्यांचे मांडग बनवून खाऊया त्यात काय एवढ? मांडग झाले का? शंभूजवळ घाडग्यातून पाठवून देते. तुम्ही तुमच्या कामाला जावा असे म्हणून तांब्याभर पाणी आणून दिले आणि साजूका शेजारच्या तानुआत्याच्या घरी गेली. शेषाप्पाने हातात कुऱ्हाड घेऊन शेरडीच दाव सोडून शेरडाना रानात चरायला घेऊन चालला. तस कुत्र उठून शेषाप्पाच्या माग जाऊ लागल.
शेषाप्पाने तीनचार दिवस अधिकरावच्या घरी दाण्यासाठी हेलपाटे घातले पर, दाने काय मिळाले नाहीत. खिन्न मनाने तक्याजवळील लिंबाच्या झाडाखाली टेकून बसला. त्यावेळी भावकीतील कारभारी मंडळीनी विचारले. आर असा चेहऱ्यावर सुतक घेऊन का बसलाय, काय झाल हाय? त्यावर शेषाप्पा, पांडा व धोंडीबानां म्हणाला, अधिकरावच्या शेतात सारा ओढला, बांध घातला, ताल फुटलेली भरुन घेतली. पण ठरलेलं पायलीभर दाण देत नाही. तीनचार दिस झालं, नुसत हेलपाटचं घालतूया, घरात दान नाहीती काय करु सांगा? घरात जाऊ सुध्दा वाटत नाय? पांडा व धोंडी गंभीर झाले यावर काय मार्ग निघतुया का बघुया तेवढ्यात किसना, येताळा ही वयस्कर मंडळी म्हणाली गड्यांनो यावर भांडण करु नका. तुम्हीं बापूच्या कानावर गोष्ट घाला त्याच बरोबर त्यांच्या समाजातील चार चौघांच्या कानावर घाला बघु काय होते ते ह्या बोलण्याला सर्वांनीच होकार दिला. धोंडी, पांडा म्हणाले, तुम्ही म्हणता ते बरोबर हाय तसच करतो म्हणून बापूच्या घरचा रस्ता धरला.
5 Page
बापूला सर्वांनी राम राम घातला बापू झाडाच्या सावलीला पारावर बसलेले होते. बापू म्हणाले, गडघानो का येण केल. त्यावर पांडा, धोंडी, सखाराम म्हणाले, अधिकरावने शेतात सार, बांध, पलानीचे काम शेतात करुन घेतले आहे. उरलेले पायलीभर दान दिलेले नाहीत. हे सांगायला आलो आहे. याबाबत काय ते बघा व मार्ग काढा. त्यावर बापू म्हणाले, आज देवळाच्या पारावर गेल्यावर अधिकरावला बोलतो. शेषाप्पाला कामाचे दान द्यायला सांगतो म्हणाले. त्यावर सर्वजण तक्याकडे निघून आले.
बापू गावातील मोठी आसामी होती, बापूच्या शब्दाला किमत होती, गोरगरीबांची बाजू घेऊन समजून न्याय मिळवून देत होते. संस्थानात काही काळ मंत्री म्हणून काम केलेले होते. त्यांना गावच्या सर्व जाती धर्माच्या लोकांबद्दल जिव्हाळा होता.
शेषाप्पा घरी आला मोठ्या मेढीला टेकून बसला. महादाजवळ आला. त्यांच्या तोंडावरुन हात फिरवून साजूकाला म्हणाला. अंग संभू कुठे हाय? कुठे गेला हाय? त्यावर म्हणाली मल्हारीच्या रानात गेला आहे. त्यांनी ओपाभर गाजरे ठरवून घेतलेली आहेत. मल्हारीला घरी आडपाडून द्यायचा आहे. या बोलीवर मल्हारीने ओपाभर गाजरे आपल्याला दिलेली आहेत ते खंदून आणण्यासाठी गेलेले आहेत. सोबत नाथाचा बापू पण गेलेला आहे. गाजरे आणली का शिजवून तुम्हांला देती. यावर शेषाप्पा झोपडीच्यादाराकडे टक लावून पहात होता. साजुका पुन्हाः म्हणाली, अव देवाने निदान जगायला गाजरे तरी दिले आहेत, पांडुरंगाचे उपकार माना असे म्हणून चुल पेटवायला लागली.
सकाळी शेषाप्पा कुन्हाडीला दगडी निशानावर धार लावत बसला होता. त्यावेळी रामू लोहार येऊन म्हणाला. अधिकरावानी तुला वाड्यावर बोलविलेले आहे. मला घेऊन यायला सांगितले आहे. त्यावर शेषाप्पाने रामू लोहाराकडे एकवेळ बघितले व म्हणाला काय काम आहे? त्यावर रामू म्हणाला लेका मला काय माहित? पुढे घालून आणायला सांगितले आहे. आर पाय धु तर साखळ्या कितीच्या म्हणायचे काय कारण आहे? त्यावर शेषाप्पाचे डोळे चमकले नक्कीच आज दान मिळणार म्हणून उठला कुन्हाड झोपडीच्या आड्याला लावून साजूकाला म्हणाला, मी वाड्यावर जाऊन येतो. असे म्हणून दोघे झपा- झप पावले टाकीत वाड्याजवळ येऊन अधिकरावला हाका मारायला लागली.
आवाज ऐकूण अधिकरावने पटकन दरवाजा उघडला समोर शेषाप्पाला पाहुण बरे वाटले म्हणाला आर म्हाजी म्हैस मेली आहे. दावणीतच कशी पडलीय बघ तुझ्यातले पाच सहा गडी घेऊन ये आणि ओढ्यात पुरुण टाक ह्याच कामासाठी तुला बोलविलेले आहे. त्यावर शेषाप्पा विचार करु लागला. अलोय दान घ्यायला अन् म्हैस पुरण्याला घेऊन जा
6 Page
: म्हणतात, त्यावर अधिकराव खेकसून म्हणाला, आर मी कुणाला बोलतूया कळतय का? तुला? शेषाप्पा अधिकरावाकडे बघत म्हणाला, माझ्याच्याने तुमची म्हैस नेहने होणार नाही. तुमची तुम्हीं व्यवस्था करा. आमच्यातल कुणीबी गडी येणार नाहीत. त्यावर अधिकराव म्हणाला तुम्हांला माज आला आहे काय? लवकरच माज उतरवितो. वाटेल ते बोलू लागला ते शब्द ऐकत ऐकत शेषाप्पाने घरचा रस्ता धरला.
शेषाप्पाने समाजातील कारभारी मंडळीच्या कानावर म्हैस मेलीची हाकिगत सांगितली. त्यावर दामू, सखाराम, किसन म्हणाले गड्यानो आपण सर्वांनी ठरवलेले आहे की, गावातील कुणाची म्हैस मेली तर आपनण पुरायला घेऊन जायची नाय असे तक्यात सर्वानुमते ठरविलेले आहे. तेच अंतिम आहे. त्यावर सर्वजन ठाम राहिले होते झाले असे होते की, मुंबई कर मंडळी गावी येताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली बहिष्कृत भारत, मुकनायक ही वर्तमानपत्रे सोबत घेऊन येत असत त्या वर्तमानपत्राचे वाचन तक्यामध्ये सर्वासमोर शंकरराव खरात वाचन करीत असत. वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या व लेख वाचून दाखविलेमुळे समाज्यात जागृती होऊ लागलेली होती. शंकररराव खरात त्या वेळी संस्थानात शिक्षण घेत होते. सुट्टीवर आले की, संध्याकाळी कंदिलाच्या प्रकाशात प्रत्येक बातमी, लेख वाचून दाखवित होते. तसेच त्याकाळी पंढरपूर व दहिवडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या जाहीर सभेला समाज्यातील कारभारी मंडळी सभा ऐकणेसाठी चालत जात होती. त्या भाषणाचा व वर्तमान पत्रातील बातम्याचा प्रामुख्याने समाज्यावर प्रभाव पडलेला होता. म्हणून धोंडी म्हणाला होता की, ह्यांच्या घरातील कोण मेल का? सांगावा सांगायला आम्हींच जायाच गुरे-ढोरे ह्यांची मेली का? आम्हींच ओढ्यात पुरायला घेऊन जायाचे हा आमच्यावर अन्याय आहे. म्हणून पांडुरंगाला हात जोडले आभाळाकडे नजरा टाकून सर्वजन आप-आपल्या कामाला निघून गेले.
गाव चावडीतील कोतवाल शेषाप्पाच्या झोपडी बाहेर येऊन मोठ्याने म्हणाला, घरात कुणी आहे काय? तसा शेषाप्पा झोपडीच्या बाहेर येऊन कोतवालास म्हणाला, काय काम काढले आहे? त्यावर कोतवाल म्हणाला, तुझ्या विरुध्द तक्रारीचा अर्ज आलेला आहे? गावच्या पाटलानी तुला चावडीवर बोलविलेले आहे. त्यावर शेषाप्पा शांत होता, पण साजूका घाबरली रडायला लागली. संभू म्हणाला कोणी वर्दी दिली. त्यावर कोतवाल म्हणाला, शेषाप्पाना घेऊन येण्याचे फर्मान दिलेले आहे. एवढच मला माहित आहे. त्यावर शेषाप्पाने सर्वांना शांत राहणेबद्दल सांगितले व कोतवालाबरोबर चावडीकडे चालू लागला. साजूका कावरी-बावरी झाली काय करावे तीला कळेना साजूका रडू लागली, म्हणून महादू
7 Page
रडू लागला, संभू समाज्यातील कारभारी मंडळी शोधू लागला समाज्यात बातमी कळाली की शेषाप्पाला चावडीवर धरुण नेहले आहे.
गाव चावडीत पाटील व पंचमंडळी हजर होती. अधिकराव मिशीला पिळ देऊन शेषाम्पाकडे नजर रोखून बघत होता. पाटील म्हणाले, शेषाप्पा तुझ्या विरुध्द अधिकरावानी तकार दिलेली आहे. ती खरी आहे का? त्यावर हात जोडून सर्वांना म्हणाला तक्रार खोटी आहे. त्यावर अधिकराव म्हणाले, अहो पाटील, असे नरमाईने बोलून तो ऐकल का? त्याचे हातपाय बांधून चाबकाने फोडा खरे काय तो बोलेन त्यावर अधिकरावाकडे पहात पाटील म्हणाले, काय करायचे ते आम्हीं बघू तुम्ही शांत बसा तसे ते शांत झाले. पंचमंडळीची खलबते सुरु झाली हा प्रकार गावचावडी समोर सुरु होता. गर्दी होऊ लागली तसा अधिकरावला चेव चढू लागला. साजूका म्हादूला घेऊन केविलवाणी लांबूनच सर्व प्रकार बघत होती.
शंभूने भावकीतील कारभारी पांडा तात्या, धोंडी आण्णा, येताळा, आबा, सोपाना काका यांना सांगून बापूना चावडीवर घेऊन आले. बापूंना बघुन सर्वांनी रामराम केला. बापू पंचमंडळीना म्हणाले, शेषाप्पाला कशासाठी धरुन आणलय. त्यावर पाटील सर्वांनकडे बघत म्हणाले, अधिकरावांनी आमचेकडे तक्रार दिलेली आहे. शेषाप्पाने शेतातील सार, बांध केलेले मोडून टाकलेले आहेत. पलानीवरील भरलेली माती काढून टाकलेली आहे. शेताच नुकसान केलेले आहे. त्यासाठी चौकशीसाठी आणलाय. त्यावर पांडा व धोंडी गाव पाटलांना म्हणाले तुम्हीं म्हणता हाय ते सर्व खरे आहे पण शेषाप्पाने अस का केल ? त्याला विचारल का? त्यावर पाटील म्हणाले तो काय बोलतच नाय? त्यावर बापू, गावपाटील व पंचमंडळी म्हणाली शेषाप्पा खरे काय असेल ते बोल दोन्ही बाजू ऐकून घेतल्याशिवाय न्याय निवाडा करता येणार नाही. असे म्हणून शेषाप्पाकडे पाहू लागले.
त्यावर शेषाप्पा हात जोडून सर्वांना म्हणाला, तुम्हीं गावची जानती माणस हाय, न्याय निवाड्याला तुम्ही पाच परमेश्वर म्हणून उभे आहात, माझ ऐकूण घ्या. माझ काय चुकलं असेल तर सांगा? असे म्हटल्यावर सर्वांच्या नजरा शेषाप्पाकडे वळल्या शेषाप्पा म्हणाला, मल्हारीने झोपडी शेकरायला काड दिलेले होते. त्यामुळे त्याच्या शेतातले काम करुन आलो होतो. अधिकरावांनी मला बोलावून सांगितले, शेतात सार, बांध, पलान फुटलेली मातीने भरुन घ्यायची आहे. या कामासाठी पायलीभर दान देतो म्हणाले होते. दिवसाच्या आत सर्व काम करुन दिले पण मला पायलीभर दान दिले नाहीत, मी त्यांच्या वाड्यावर तीनचार वेळा हेलपाटे मारले, त्यांना सांगितले की, घरात दान्याचा कण सुध्दा
8 Page
: नाही. पायलीभर दान द्या. मालक म्हणून हात जोडले परंतु त्यांनी त्यांचा विचार केला नाही. बापूनां व दोवा-तीघाच्या कानावर गोष्ट घातली. माझ्या भावकीतील कारभाऱ्यांना बोललो आहे. घरात सर्वजन उपाशी आहेत. या कामाच्या मोबदल्यात दान देण्याचे तुम्हीं कबूल केल होते. तेवढ गरीबाला दान द्या म्हणून विनंती केली होती. परंतु त्यांनी ती ऐकली नाही मनावर घेतली नाही म्हणून मी माझ्या हाताने ज्या शेतात काम कष्ट करुन सार, बांध, पलान केली होती ते माझ्या हाताने काढून टाकले आहे? त्यांची जमीन काय उचलून आणलेली नाही. त्यांची जमिन माती जागेवरच आहे? यात माझा काय दोष पोटासाठी काम करुन सुध्दा त्यांचा मोबदला मिळत नाही. याला काय केले पाहिजे. या बोलण्यावर गाव पाटील, पंचमंडळी, गावगाड्यातील मंडळी व बापू सुन्न होऊन शेषाप्पाकडे पाहून विचार करु लागले.
त्यावर पाटीलांनी पंचाबरोबर खलबत करुन बापूचा विचार घेतला व अधिकरावाला म्हणाले शेषाप्पाने पोटासाठी काम केले आहे, तर कामाच्या मोबदल्यात तुम्हीं त्याला पायलीभर दान कबूल केलेले द्यायला पाहिजे होते चुक तुमची हाय? असे म्हणून कोतवालाला म्हणाले, शेषाप्पाच्या हाताचा व पायाचा कासरा सोड व त्याला रिकामा कर शेषाप्पाची काहीही चुक नाही. असे बोलल्यावर अधिकराव चिडून म्हणाले, पाटील तुम्हीं चुक करताय तुम्हीं आमच ऐकत नसाल, तर संस्थानात जाऊन शेषाप्पाच्या विरुध्द तक्रार देणार आहे. तुम्ही हे काय बरोबर करीत नाही माझी म्हैस मेली तर ओढ्यात नेहून पुरली नाही. गावाच्या रितीचा विरुध्द वागतात त्यांचा नीट विचार केलेला नाही असे म्हणून चावडी वरुन तावातावाने निघून गेले. शेषाप्पाच्या डोळ्यात आश्रू आले. सर्वांना हात जोडून रामराम घालून भावकीतील मंडळी बरोबर घरी निघून आले. गावान न्याय केला म्हणून पांडुरंगाचे आभार मानले.
संभू व किसना मारुती माळ्याच्या रानात ताल घालण्याचे काम करीत होते. उन्हामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. राणू आण्णा पाटलाच्या वस्तीकडे चालला होता. संभू व किसना दिसल्यावर म्हणाला, काम जोरात चालल हाय वाटत. या थोडी तंबाखू खावा, पाणी प्या, थोड बसा मग काम करा. त्यामुळे दोघांनी काम थांबविले. राणू आण्णाला राम राम केला. धोतऱ्याच्या खोग्याने तोंड, हात पुसत येऊन झाडाखाली बसले गाडग्यातील गार पाणी प्याले आणि म्हणाले, पाटलांनी निरोप दिलाय त्यांना भेटायला चाललो आहे. असे म्हणून पेरणीतील कप्पातून बटवा काढून तंबाखू किसनाला दिली
9 पेज
 दोघांनी मिळून खाल्ली. इकडच्या तिकडच्या गप्पा झालेवर राणू आण्णा संभूकडे काळजीच्या नजरेने बघत म्हणाले, अधिकराव त्याच्या पै-पाहुण्यांना घेऊन बैलगाडी करुन कुठे तरी गेलेले आहेत. त्यावर किसना म्हणाला आर राणुबा ताकाला जाऊन मोगा कशाला दडवतुया? काय ते खर सांग की, कोड्यात बोलू नगस त्यावर राणूबाने इकडे तिकडे बघत म्हणाला, मला जे कळलंय ते तुम्हांला सांगतुया कुणाजवळ माझ नांव घेऊ नका. त्यावर किसना व संभू म्हणाले, आम्हीं कुणाला काय सांगत नाही खर काय ते सांग त्यावर राणूबाने उसासा घेऊन सांगू लागला. शेषाप्पा व संभूच्या नावाने अधिकराव संस्थानात तक्रार करायला गेलेला आहे. त्याचे मातब्बर पै-पाहुणे सुध्दा बरोबर घेऊन गेलाय. त्यामुळे कायतरी लचाड तुमच्या माग लावील तुम्ही सावध रहावा. धीराने व सबुरीने वागा असे सांगून राणूबा पाटलाच्या घराकडे चालू लागला. संभू विचार करु लागला. त्यावर किसना म्हणाला, काय रं संभू काय झालं? त्यावर संभू म्हणाला, माझ्यावर काय तरी अधिकराव लचाड आणणार बघ? त्यावर किसना म्हणाला, आर आम्ही भावकी काय वाटेची उनेकरी नाही. तू काय सुध्दा घाबरु नक सगळी भावकी तुमच्या दोघांच्या माग उभी हाय. काय सुध्दा होणार नाही, घाबरु नगस.
त्यावर संभू म्हणाला, किसना तुला आता सांगतो ते ऐक मी आता गावात येत नाही. मुंबईला बहिणीकडे जातो या गांव गाड्याच काम करुन जीव वैतागला आहे. सुखान राहता बी येत नाही अन खायलाबी मिळत नाय. आपण दोघे मिळून मारुती माळ्याच्या घरी जाऊया. त्याच्याकडून पाच रुपये घेऊन मी मुंबईला जातो चल माझ्या बरोबर असे म्हणून कामाची हत्यारे कोपीत ठेऊन दोघेही मारुती माळ्याच्या घरी आले अन् म्हणाले, मला पाच रुपये द्या, मुंबईला जायाचे आहे. तुमचे थोडे राहिलेले काम माझा भाऊ शेषाप्पा व किसना मिळून पुरे करतील. त्यावर त्याने आडे-वेढे घेत चार रुपये दिले. ते घेऊन संभू चालत रात्रीचाच म्हसवडला गेला. तिथून बहिणीचा पत्ता ठाव ठिकाणाची माहिती घेऊन मुंबईकडे निघून गेला.
घरी किसनाने येऊन शेषाप्पाला सर्व माहिती दिली शेषाप्पा मनातून हादरुन गेला. त्याला काय करावे काय सुचेना साजूका शेषाप्पाजवळ येऊन म्हणाली काय झाल व शेषाप्पा म्हणाला, माझी लय मोठी चुक झाली बघ सार व बांध मोडायला संभूला सोबत घेऊन गेलो, ती फार मोठी चुक झालीया. अधिकराव संस्थानात तक्रार द्यायला गेला आहे हे संभूला कळलेले आहे. म्हणून तो मुंबईला बहिणीकडे गेलेला आहे. वाईट झाले माझा भाऊ मला सोडून गेला. त्याच्या डोळ्यातून आपोआप धारा वाहवू लागल्या. साजूकापण
 पेज १०
 रडायला लागली हे दोघे रडतात, म्हणून लहान महादू सुध्दा रडू लागला, रडण्याच्या आवाजाने व शेळ्या ओरडायला लागल्या. कुत्र पायाजवळ येऊन बसल या आवाजाने भावकीतील बाया-माणस शेषाप्पाच्या झोपडीजवळ जमा झाली. त्यांना काय ते कळले भावकीतील कारभाऱ्यांनी शेषाप्पाची समजूत घातली सर्व ठिक होईल, काळजी करु नकोस आम्ही आहे, धीर दिला व म्हणाले, आपल्या दाजीचा यशवंता मुंबईला आहे, त्याला पत्र पाठवून संभूची काळजी घ्यायला सांगूया, अशी समजूत घालून भावकीतील बाया माणस आपआपल्या घरी गेले.
शेषाप्पाला रात्री झोपताना संभूचा चेहरा सारखा दिसू लागला, बाहेर कुत्री जोर जोरात भुंकत होती. रात्रीच्या अंधारात किर्रकिड्यांचा आवाज घुमत होता. पांडुरंगाला हात जोडून संभूची काळजी घेरे बाबा म्हणून मनातून साद घातली, अनेक विचाराचे काहूर मनामध्ये येत होते. पुढे काय करायचे याचा ठाम निश्चय मनामध्ये ठरवित विचार करु लागला……..
*लेखक*
*आयु. विलास खरात*
 *आटपाडी, ता. आटपाडी, जि.*

इतरांना शेअर करा