प्रतिनिधी :- सुधीर पाटील.. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
आटपाडी :दि.२९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाच्या राज्यातल्या ओबीसी, भटके विमुक्त आणि अल्पसंख्याक विभागाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची खास बैठक दि . २८ मार्च रोजी पक्षाच्या मुख्यालयात पार पडली . महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या वतीने लढविल्या जाणाऱ्या १० लोकसभा मतदार संघातल्या पदाधिकाऱ्यांचा यात मुख्यत्वाने समावेश होता .
पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि पक्षाच्या प्रवक्त्या माजी आमदार विद्याताई चव्हाण, पक्षाचे प्रदेशचे सरचिटणीस रविंद्र पवार साहेब , पक्षाचे प्रवक्ते महेशजी तपासे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर साहेब, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब, भटक्या विमुक्त विभागाचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड, ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली . या बैठकीस शेकडो मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने लढणाऱ्या प्रत्येक जागेवर शरदचंद्रजी पवार साहेबच उभे आहेत या भावनेने, प्रचंड जिद्दीने या निवडणूकीत काम करावे . इंडिया आघाडी अर्थात महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांच्या सर्वच उमेदवारांसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जीवाचे रान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले .
भाजपाच्या १० वर्षाच्या कारभाराने देशाला अधोगतीकडे नेले आहे . प्रत्येक घटक सर्वच बाजुंनी त्रस्त आहे. असुरक्षित आहे . देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी आणि देशातल्या प्रत्येक घटकाचा सर्वांगीण, चौफेर विकासासाठी ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्वाची आहे . इंडिया आघाडीचा प्रत्येक उमेदवार जिंकण्यासाठी जनता जनार्दनाला सजग करणे अत्यंत महत्वाचे आहे . राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी देशाची अधोगती रोखण्यासाठी या निवडणूकीत अत्यंत परिश्रम घेत डोळसपणे काम करण्याचे आवाहनही यावेळी मान्यवरांनी केले .
सर्वच बाबीत वाढलेली प्रचंड महागाई, महिलांच्यावर होत असलेले अन्याय, अत्याचार, युवा पीढीला उध्वस्त करण्याचे सुरु असलेले षडयंत्र, भांडवलदारांच्या हिताचे घेतले गेलेले निर्णय, शेतकरी, कष्टकरी, आम माणसांची सर्व बाजुंनी केली गेलेली कोंडी, इडी, सीबीआय, वगैरे संस्थाकडून सुरू असलेला एकतर्फी अन्याय,भ्रष्टाचाऱ्यांना दिले जाणारे अभय, उद्योगपतींची माफ केलेली हजारो कोटींची कर्जे, हजारो कोटींचा होत असलेला भ्रष्टाचार, जाती, धर्मात वाढविला जात असलेला विद्वेष, धार्मिक ध्रुवीकरण, अनेक संस्थाचे केले गेलेले खाजगीकरण, न्याय व्यवस्थेवर आणला जाणारा दबाव, देशाच्या मालकीच्या संस्था, साधने, संपत्तीची केली गेलेली विक्री, इलेक्टोरेल बॉन्डच्या माध्यमातून केलेला गेलेला सर्वात मोठा भ्रष्टाचार, इत्यादी शेकडो गंभीर बाबींना जनतेपर्यत नेत, त्यांना पटवून देणे गरजेचे आहे. इंडिया आघाडीच्या वास्तव खऱ्या गॅरेंटीच्या जाहीरनाम्यातील प्रत्येक आश्वासन जनतेपर्यंत पोहचविले पाहीजे . महिला, शेतकरी, युवक यासह सर्वच घटकांचे हित साधणाऱ्या या बाबी मतदारांपर्यंत पोहचविण्यात सर्वच कार्यकर्त्यांनी युद्धपातळीवर आघाडी घेतली पाहिजे. असे आवाहन खासदार वंदनाताई चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले .
यावेळी अनेक मान्यवरांनी अनेक महत्वपूर्ण बाबी, प्रश्न, समस्या, देश, राज्य पातळीवरील सर्व समाज घटकांच्या हिता संदर्भात मांडणी केली .