महा आवाज News

राज्यस्तरीय कायाकल्प कार्यक्रमांतर्गत बारामती येथील महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयास पुरस्कार जाहीर..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

राज्यस्तरीय कायाकल्प कार्यक्रमाअंतर्गत राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात येणारा सन २०२३-२०२४ चा ३ लाख रुपयांचा उत्तेजनार्थ पुरस्कार बारामती येथील महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयास जाहीर झाला आहे.

या कार्यक्रमांतर्गत माहे सप्टेंबरमध्ये राज्यस्तरीय मुल्यांकन पथकाने भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली होती. यामध्ये रुग्णालयात रुग्णांना अतितात्काळ सेवा, सर्व प्रकारच्या सोई- सुविधा, जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट, संसर्ग नियंत्रण, आरोग्य सुधारणा प्रचार व तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा, रुग्णालय परिसरात चार व दोन चाकी वाहनतळ, तसेच पर्यावरण पूरक वातावरण आदी बाबींची पथकाने पाहणी केली होती. राज्यस्तरीय कायाकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या मुल्यांकनाद्वारे एकूण ८३.१४ टक्के आणि इकोफ्रेंडली मुल्यांकनात ८२.८६ टक्के इतके गुण प्राप्त झाले आहेत.

पुणे मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागनाथ येमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाचे काम करण्यात येत आहे. येथील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, स्टाफ नर्स, मेट्रन आदींच्या अथक परिश्रमामुळे रुग्णालयाने या पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे, अशी प्रतिक्रिया रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई यांनी व्यक्त केली आहे.

इतरांना शेअर करा