प्रतिनिधी:- कपिल कांबळे ..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
गणराज सोसायटीत नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. सोसायटीतील महिलांनी लोकगीत गाऊन फेर धरून आनंद उत्सव साजरा केला. यामध्ये पार्वतीबाई विलास सावंत ,माधुरी राजेंद्र वाबळे संगीता कांबळे,विद्या अनभुले, यांनी लोकगीत गाऊन नात्यासह फेर धरला. यामध्ये प्रामुख्याने
“आला ग बाई पंचमीचा सण’
“सुखी ठेव माझा भाऊरायाला”,
“अरे अरे कासार दादा माझ्या राहिला बांगड्या देशील र माझा मैतर होशील र”!!
“नागपंचमीच्या गं दिवशी मी गं नेसले हिरवी साडी!!
नाग भाऊराया मला पाठवितो गं गाडी”!!
“या गं या गडयिनी या गं या मैतरणी!!
तेल्या तांबोळीच्या बाई वान्या बामणाच्या बाई”!!
नागपंचमीच्या सणाला बहिणीला माहेरी नेण्यासाठी तिचा बंधू यायचा. माहेरी जाण्याकरिता परवानगी घेण्यासाठी तिला सासू-सासरे, दीर-नणंदा, पतिराज यांची आर्जवे करावी लागत. अशावेळी ती या लोकगीतातून सासूरवाशीण सासूला म्हणते _ _ _ _ _
पंचमीच्या सणाला, बंधू आल्यात नियाला ।
बंधू आल्यात नियाला, रजा द्या मला जायला ।
सासू म्हणते, मला काय विचारतीस? विचार तुझ्या सासऱ्याला ।
सासरा म्हणे, मला काय विचारतीस? विचार तुझ्या पतीला !!……
“खीस बाई खिस दोडका खिस दोडक्याची फोड लागली गोड”
झिम्मा-फुगडी, घोडा-चुईफुई, पिंगा-काटवटकाना, पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळता-खेळता उखाणे, गाणी म्हणून मन मोकळं केले. महिला वर्तुळाकार आकार तयार करून झिम्मा-फुगडीसारखी नृत्ये व खेळ खेळल्या.
आख्यायिका : एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशीही समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, काही नियम पालन करण्याची प्रथा आहे. श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.आपल्या ग्रामीण बोली भाषेत त्यांनी आपल म्हंन सांगितलं “अपून जरी गावाकडन शेरात जगायला आलू असलू तरी आपल्याला आपल सण, उत्सह,कारवे कस इसरून चाललं अशा परमान आपली संसकुर्ती, परंपरा आहे” त्यामुळं आम्ही ही दरवर्षी परमान इथ सगळ्या बायका मिळून ही पंचमीचा सण गाणी म्हणून साजरा करतू.असे मत पार्वतीबाई विलास सावंत यांनी व्यक्त केले.